नागपूर विद्यापीठ निवडणूकांत सरशी कुणाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:25 PM2017-11-28T22:25:44+5:302017-11-28T22:36:19+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. ३६ तासांच्या ‘मॅरेथॉन’ मतमोजणीनंतर डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनातील ‘सेक्युलर पॅनल’ व डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ‘यंग टीचर्स असोसिएशन’मध्ये तुल्यबळ लढत दिसून आली.

who is the winner at the Nagpur University elections? | नागपूर विद्यापीठ निवडणूकांत सरशी कुणाची ?

नागपूर विद्यापीठ निवडणूकांत सरशी कुणाची ?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सेक्युलर’, ‘यंग टीचर्स’ दोघांचाही अव्वल असल्याचा दावाविधिसभा, अभ्यास मंडळात ‘यंग टीचर्स’चे वर्चस्वशिक्षण मंचाला अंशत: दिलासा३६ तास चालली ‘मॅरेथॉन’ मतमोजणी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. ३६ तासांच्या ‘मॅरेथॉन’ मतमोजणीनंतर डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनातील ‘सेक्युलर पॅनल’ व डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ‘यंग टीचर्स असोसिएशन’मध्ये तुल्यबळ लढत दिसून आली. मात्र विद्यापीठात ‘नंबर वन’ कोण, यावरून ‘यंग टीचर्स’ आणि ‘सेक्युलर’मध्ये ‘सोशल मीडिया’वरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.विधिसभा व विद्वत् परिषदेतील आकडेवारी लक्षात घेतली तर ‘सेक्युलर’ने ‘यंग टीचर्स’च्या तुलनेत अवघी एक जागा जिंकत निसटती आघाडी घेतली. मात्र विधिसभा व शिक्षण मंडळात ‘यंग टीचर्स’च्या उमेदवारांनी सर्वात जास्त प्रमाणात विजय मिळविला. दुसरीकडे विद्यापीठ शिक्षण मंचचे गणित मात्र विस्कटल्याचे चित्र आहे.
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक ९२.८२ टक्के मतदान झाले. विधिसभेच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी सोमवारी मतमोजणी सुरू झाली होती. सोमवारी
मध्यरात्रीपर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार विधिसभा व विद्वत् परिषद मिळून ‘यंग टीचर्स’ने आघाडी घेतली होती. मात्र मंगळवारी विधिसभेतील शिक्षक गटातील निकालानंतर चित्र पालटले. या दोन्ही प्राधिकरणांत ‘सेक्युलर’ने १२ जागांवर विजय मिळविला, तर ‘यंग टीचर्स’चे ११ उमेदवार निवडून आले. शिक्षण मंचच्या ७ उमेदवारांनी विजय मिळविला. तर शिक्षकांची मोठी सदस्यसंख्या असूनदेखील ‘नुटा’ला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

आम्हीच अव्वल : वंजारी
प्राधिकरण निवडणुकांत अव्वल कोण, यात वादाचा विषयच नाही. आम्ही विधिसभा व विद्वत् परिषदेत १२ जागांवर विजय मिळवत प्रत्यक्ष बाजी मारली आहे. अभ्यास मंडळाचा येथे विषय येत नाही, असे मत ‘सेक्युलर पॅनल’चे नेतृत्व करणारे अ‍ॅड.अभिजित वंजारी यांनी व्यक्त केले.

तिन्ही प्राधिकरणांत आम्हीच ‘टॉप’ : तायवाडे
ही निवडणूक विधिसभा, विद्वत् परिषद व अभ्यास मंडळांसाठी होती. विधिसभेत आम्ही अव्वल आहोत व १९ अभ्यास मंडळात आमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे खरे वर्चस्व आमचेच आहे. आम्ही पुराव्यांशिवाय बोलत नाही, असा दावा ‘यंग टीचर्स असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी केला आहे.

मंचची विद्वत्मध्ये चांगली कामगिरी
विधीसभेत फटका बसलेल्या मंचने विद्वत् परिषदेत मात्र चांगली कामगिरी केली. एकूण आठ जागांपैकी तीन ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित पाच जागांपैकी तीन ठिकाणी मंचच्या उमेदवारांनी बाजी मारली. तर ‘सेक्युलर’चे दोन उमेदवार निवडून आले. जर बिनविरोध उमेदवारांसह एकूण आकडेवारी लक्षात घेतली तर शिक्षण मंचचे चार, ‘सेक्युलर’चे तीन व ‘यंग टीचर्स’चा एक उमेदवार निवडून आला. विद्वत् परिषदेत ‘यंग टीचर्स’चे गणित चुकल्याचे दिसून आले.

बिनविरोध उमेदवार कुणाचे ?
दरम्यान, विधिसभा व विद्वत् परिषद मिळून एकूण पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात विधिसभेत चंदनसिंह रोटेले व सुधीर फुलझेले तर विद्वत् परिषदेत वर्षा धुर्वे, आसावरी दुर्गे व वसंत राठोड यांचा समावेश आहे. यातील रोटेले, फुलझेले व धुर्वे हे उमेदवार आपले असल्याचा दावा ‘सेक्युलर’कडून करण्यात आला आहे. तर रोटेले व फुलझेले हे आम्हीच उभे केलेले उमेदवार असून ते आम्हालाच समर्थन करतील, असा दावा ‘यंग टीचर्स‘ व शिक्षण मंचाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे उमेदवार नेमके कुणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात डॉ.चंदनसिंह रोटेले यांना विचारणा केली असता सर्वांनाच मी जवळचा वाटत आहे. मात्र मी सध्या कोणत्या ‘पॅनल’ला समर्थन करायचे हे ठरविलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्वत् परिषदेत आसावरी दुर्गे या आपल्या उमेदवार असल्याचे मंचातर्फे सांगण्यात आले आहे. तर वसंत राठोड हे ‘यंग टीचर्स’कडून असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Web Title: who is the winner at the Nagpur University elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.