अख्खे कारागृह रात्रभर शांत : याकूबसह कैदीही जागेच
By admin | Published: July 31, 2015 02:30 AM2015-07-31T02:30:08+5:302015-07-31T02:30:08+5:30
तब्बल २९ वर्षांनंतर फाशीच्या शिक्षेचा ताण अनुभवणाऱ्या कारागृहात बुधवारची रात्र कमालीच गडद झाली.
ते सात तास, रोखला श्वास !
नागपूर : तब्बल २९ वर्षांनंतर फाशीच्या शिक्षेचा ताण अनुभवणाऱ्या कारागृहात बुधवारची रात्र कमालीच गडद झाली. रात्रभर हे कारागृह जागे होते. मात्र, प्रत्येकाच्याच मनावर ताण होता. कुणाला भीती वाटत होती तर कुणावर जबाबदारीचे दडपण होते. होय, मध्यरात्रीनंतर हे दडपण वाढतच गेले. रात्री १२ ते सकाळी ७ या सात तासात घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे तुरुंग प्रशासनावर ताण वाढला.
मात्र, सकाळी ७ वाजता फासावर लटकवून याकूबचा श्वास रोखला अन् तुरुंगात उपस्थित असलेल्या सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला ३० जुलैला सकाळी ७ वाजता फासावर चढवले. २९ जुलैच्या सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाने याकूबची याचिका खारीज केली तर राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळला. बुधवारी रात्रीपासून त्याला फासावर टांगण्यासाठी कारागृहातील फाशी यार्डात धावपळ वाढली.
कैदी झोपलेच नाही
एरवी स्मशानशांतता अनुभवणाऱ्या फाशी यार्डात वारंवार अधिकारी, कर्मचारी अन् त्यांच्यासोबत खुल्या कारागृहातील काही कैदीही (बावा) जात-येत होते. त्यामुळे तेथील कर्णकर्कश ठोकपिट वाढली होती. परिणामी बुधवारी सायंकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे बराकी बंद झाल्या. कैद्यांचे जेवणही झाले. मात्र, झोपी कुणीच गेले नाही. प्रत्येकाची नजर जरी जात नसली तरी फाशी यार्डातील भेसूर वातावरण बहुतांश जण अनुभवत होते. मध्यरात्री अचानक फाशी यार्डातील धावपळ थांबली. आवाजही बंद झाले. त्यामुळे कैदीच नव्हे तर कर्मचाऱ्यांचीही अस्वस्थता वाढली. काय झाले, त्याची उत्स्फूर्त चौकशी होऊ लागली. एरवी कैद्यांशी फटकून वागणारे सुरक्षा रक्षक कैद्यांना माहिती देऊ लागले. याकूबच्या फाशीसंदर्भात ऐतिहासिक घडामोड झाल्याचे वृत्त मध्यरात्री १२ ला कारागृहात पसरले. काहींना ती मस्करी वाटली तर, काहींना खरे. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक तासाची कारागृहात वाजणारी (वेळ सांगणारा) घंटा अधिकच कर्कश आवाज करू लागली. काय झाले काय झाले, असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला. अर्थातच् उत्तर खूप वेळेनंतर अन् अर्धेच मिळत होते.
याकूबचीही पापणी लागेना
तिकडे याकूबच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती. पहिल्यांदाच तो कधी उठून बसत होता तर कधी उभा राहात होता. कधी दाराजवळ येत होता तर कधी दाराकडे पाठमोरा होऊन स्वत:शीच बोलत होता. त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गार्डच्या ध्यानात त्याची तगमग आली होती.
जीवघेणा संदेश
कारागृहातील या अस्वस्थ वातावरणातच मध्यरात्री सुलेमानच्या नावे एक लिफाफा तयार केला. रात्री १.४५ वाजता हा लिफाफा घेऊन दोन कर्मचारी सीताबर्डीतील हॉटेल द्वारकामध्ये आले. यावेळी सुलेमान आणि उस्मान टीव्हीवरील घडामोडींकडे टक लावून बघत होते. याकूबला सर्वोच्च न्यायालयातून आता तरी दिलासा मिळेल, अशी त्यांना आशा होती. याच वेळी लिफाफा मिळाल्यामुळे त्यांनी तो उघडला. त्यात एक पत्र होते. याकूबला सकाळी ७ वाजता फासावर टांगले जाणार, अशी त्यात माहिती होती. त्यामुळे सुलेमान आणि उस्मान अधिकच गंभीर झाले.