नागपुरातील इतवारी व मस्कासाथमधील ठोक बाजार केला बंंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:32 AM2020-03-25T00:32:44+5:302020-03-25T00:34:39+5:30
मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी जनता कर्फ्यू असतानाही शहरातील किराणा दुकाने सर्वत्र सुरू होती. सोमवारीही मनपा आणि पोलिसांनी बंद केली नाहीत. पण मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. माल नसल्याने आज, उद्या किराणा दुकाने बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्राहकांना जीवनाश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागेल.
कोरोना या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू झाले आहे. पण त्याचे गांभीर्य लोकांना अजूनही कळले नाही. लोकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळेच मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी किराणा दुकानेही बंद करण्यास सांगितली. तसे पाहता शासनाने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर लोकांनी पाच ते सहा दिवसांपूर्वीपासूनच किराणा मालाची खरेदी सुरू केली आहे. अनेकांकडे दोन ते तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. दुकानदारांनीही ग्राहकांनी मागितला तेवढ्या मालाची विक्री केली आहे. किराणा दुकाने बंद राहिल्यास दररोज खरेदी करणाऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे लोकांनी आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन किराणा असोसिएशनने केले आहे.
शासनाने किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावा
होलसेलमधून रिटेलमध्ये माल येणारच नाही, तर आम्ही विकणार काय? दोन तास दुकान सुरू ठेवणे परवडणार नाही. कलम १४४ मुळे कर्मचारीच येत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंचा साठा केल्याचा समज लोकांमध्ये होऊ नये. त्याकरिता शासनाने पुढाकार घेऊन किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावा. लोकांनी शहराची स्थिती समजवून घ्यावी. गर्दी करू नये. आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करावी.
प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.
माल असेपर्यंत विक्री करणारच
होलसेलमधून पुरवठा बंद झाल्यानंतरही माल असेपर्यंत विक्री करणार आहोत. याकरिता शासनाने मदत करावी. मालाच्या पुरवठ्याला तात्काळ परवानगी द्यावी.
ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.
...तर खाद्यतेलाची विक्री बंद होणार
मालवाहतूक बंद असल्याने खाद्यतेलाचा कारखाना बंद केला आहे. शिवाय विक्रीची दुकाने बंद झाल्याने माल जाणार कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. किराणा दुकानात खाद्यतेल उपलब्ध असेपर्यंत विक्री होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने प्रशासनाने सुरू ठेवावीत.
राजूभाई ठक्कर, अध्यक्ष, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन.