ग्रा.पं.चा कौल कुणाला? नागपूर जिल्ह्यात ८०.२७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:31 AM2018-09-27T00:31:25+5:302018-09-27T00:35:14+5:30
नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात सहा ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले.
जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवारांचे भाग्य बुधवारी मशीनबंद झाले. यासोबतच विविध ग्रा.पं.मध्ये सदस्य पदासाठी नशीब आजमाविणाऱ्या ५९९४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या, गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.राजकीयदृष्ट्या विचार केल्यास नागपूर जिल्ह्यावर भाजपचे प्रभुत्व आहे. मात्र अजूनही ग्रा.पं.पातळीवर काँग्रेसची पांरपरिक पकड आहे. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं.मध्ये भाजप आणि काँग्रेसप्रणीत पॅनेलमध्ये काट्याची टक्कर झाल्याचे चित्र दिसून आले. यासोबत जिल्ह्यातील काही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाप्रणीत पॅनेलचे उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत अधिकाधिक ग्रा.पं.मध्ये सत्ता मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी यावेळी कंबर कसली होती, हे विशेष.
ईव्हीएम जोरात
सार्वत्रिक निवडणुका आणि ईव्हीएमध्ये बिघाड असे समीकरण मागील वर्षभरात झालेल्या निवडणुकात पहावयास मिळाले होते. मात्र बुधवारी नागपूर जिल्ह्यात झालेल्या ३७४ ग्रा.पं.पैकी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मध्ये कोणताही तांत्रिक बिघाड दिसून आला नाही. कळमेश्वर तालुक्यातील काही गावात याबाबत प्राथमिक तक्रारी दिसून आल्या. मात्र लगेच तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आले.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
कळमेश्वर ८१.४४
मौदा ८८.७५
नरखेड ८०.६३
भिवापूर ८०.३०
सावनेर ७७.९६
कुही ८२
उमरेड ७५
काटोल ८५
रामटेक ८०
नागपूर ग्रामीण ७३
पारशिवनी ७९.५२
कामठी ८४.९२
हिंगणा ७५