घटनास्थळावरील रुमाल कुणाचा?
By admin | Published: May 15, 2017 02:29 AM2017-05-15T02:29:38+5:302017-05-15T02:29:38+5:30
पोलिसांनी एका हत्या प्रकरणामध्ये घटनास्थळावर सापडलेला रक्ताने माखलेला रुमाल कुणाचा होता
पोलिसांकडून तपास नाही : आरोपींना संशयाचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी एका हत्या प्रकरणामध्ये घटनास्थळावर सापडलेला रक्ताने माखलेला रुमाल कुणाचा होता व तो रुमाल मयताच्या डोक्याला कोणी बांधला होता, याचा तपासच केला नाही. यासह अन्य मुद्यांमुळे सरकारी पक्षाची बाजू अविश्वसनीय ठरली. परिणामी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींना संशयाचा लाभ दिला.
ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मृताचे नाव सचिन जालंधर इंगळे होते. ८ मे २०११ रोजी त्याचे लग्न होणार होते. असे असताना तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संतोष इंगळेसोबत जळाऊ लाकडे गोळा करण्यासाठी शेतात गेला होता. त्या ठिकाणी आरोपींनी त्याला कुऱ्हाड, कुदळ व काठ्यांनी मारले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा १० मे रोजी केला. संतोष घटनास्थळावर असताना त्याने सचिनला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. तो पळून गेला. त्याने घरी जाऊन सचिनची आई छबूबाईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर छबूबाई घटनास्थळावर न जाता थेट पोलीस ठाण्यात गेली. हे मुद्दे संशय निर्माण करणारे ठरले.
सत्र न्यायालयाने चार आरोपींना निर्दोष सोडले होते तर, दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चार आरोपी निर्दोष सुटल्यामुळे शासन व तक्रारकर्तीने तर, शिक्षा झालेल्या आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वरील बाबी लक्षात घेता, शिक्षा झालेल्या आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला तर, अन्य आरोपींचे निर्दोषत्व कायम ठेवून शासन व तक्रारकर्तीचे अपील खारीज केले. आरोपींतर्फे अॅड. राजेंद्र डागा व अॅड. एस. झोटिंग यांनी बाजू मांडली.