रामटेकच्या गडावर कुणाचे होणार पानिपत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:29+5:302021-07-08T04:07:29+5:30
राहुल पेठकर रामटेक : रामटेक तालुक्यात जि.प.च्या एका सर्कलसाठी तर तीन पंचायत समितीच्या तीन गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी ...
राहुल पेठकर
रामटेक : रामटेक तालुक्यात जि.प.च्या एका सर्कलसाठी तर तीन पंचायत समितीच्या तीन गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवशी ‘बी’ फाॅर्मवरून रामटेक मतदारसंघातील काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. पारशिवनी येथे जि.प. सदस्याला मारहाण झाली. यामागचे कारण काही असो, पण यामुळे मतदारसंघात काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली. याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला किती बसतो, हे २० जुलै रोजी स्पष्ट होईलच. सध्या निवडणूक होऊ घातलेल्या पंचायतीच्या तीनही जागांवर गतवेळी काँग्रेसचा विजय झाला होता. यातील एकही जागा गेली, तर पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रामटेक तालुक्यात गत पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा महासचिव उदयसिंग यादव यांनी रवींद्र कुंभरे, भुमेश्वरी कुंभलकर, कला ठाकरे, भूषण होलगिरे व पिंकी रहाटे यांना विजयी करण्यासाठी ताकद लावली होती. यातील कला ठाकरे सभापती झाल्या. आता तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यात नगरधनची जागा उदयसिंग यादव यांनी मिळविली. तिथे त्यांच्या गटाच्या अश्मीता मुन्नीलाल बिरणवार उभ्या आहेत. या जागेसाठी जि.प. सदस्य दूधराम सव्वालाखे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आग्रही होते. पण, त्यांना तिकीट मिळाले नाही. येथूनच वादाला सुरुवात झाली.
कला ठाकरे व महेश मडावी हेही यादव यांच्या जवळचे आहेत. पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत तिनही काँग्रेसचे उमेदवार पडले, तर येथे शिवसेना सत्ता काबीज करू शकते. त्यामुळे हे सगळे राजकारण वरच्या पातळीवरून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
रामटेकमध्ये जि.प.च्या बोथियापालोरा सर्कलमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येथे कैलास राऊत यांना काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे. भाजपने लक्ष्मण केणे या नव्या चेह-याला संधी दिली आहे, तर शिवसेनेने पुन्हा देवानंद वंजारी यांच्यावर विश्वास टाकला आहे. येथे गोंगपा-प्रहार आघाडीने हरिचंद्र उईके यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे येथे चौरंगी सामना रंगणार आहे. गत निवडणुकीत कैलास राऊत यांनी २२२९ मतांनी विजय मिळविला होता. आता राऊत दोन्ही गटांचा कसा मेळ बसवितात, यावर त्यांचा विजय सुकर होणार आहे.
मनसर पंचायत समितीसाठी तीन उमेदवार उभे आहेत. माजी सभापती कला ठाकरे यांनी गतवेळी शिवसेनेच्या अर्चना पेटकर यांचा ९१५ मतांनी पराभव केला होता. आता अर्चना पेटकर या भाजपच्या उमेदवार आहेत. शिवसेनेने स्वरूपा चौधरी यांना मैदानात उतरविले आहे. येथे शिवसेना दुस-या क्रमांकावर होती.
नगरधन येथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी जि.प. सदस्य दूधराम सव्वालाखे काम करतील की, उदयसिंग यादव यांचा उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावतील, हेही २० जुलै रोजीच स्पष्ट होईल. येथे काँग्रेसचे भूषण होलगिरे काठावर ७० मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे येथे शिवसेनाही ताकत लावेल.
उमरी पं.स. गणात काँग्रेसची परीक्षा आहे. काँग्रेस मागील निवडणुकीत १०१६ मतांनी जिंकली होती. येथे सहा उमेदवार लढत आहेत. सामना मात्र चौरंगी होईल.
निवडणूक आली की, काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून येते. यावेळी मात्र दगाफटका झाला तर पंचायत समिती काँग्रेसच्या हातातून जाणार हे निश्तिच.