पेटलेली रेल्वे वॅगन कुणाची विकेट घेणार? रतलाम ते ताडालीपर्यंत चाैकशी
By नरेश डोंगरे | Updated: February 20, 2025 21:17 IST2025-02-20T21:15:34+5:302025-02-20T21:17:04+5:30
वॅगनची कॅप उघडी, गॅसकिटही खराब...

प्रतिकात्मक फोटो
नागपूर : ट्रेन आणि स्थानकावरील शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घालू पाहणारी 'पेटलेली वॅगन' कुणाकुणाची विकेट घेणार, या प्रश्नाने संबंधितांची धाकधुक वाढविली आहे. दुसरीकडे 'त्या' वॅगनचे सिल, नटबोल्ट गायब होते, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक चाैकशीत उघड झाली आहे.
१६ फेब्रुवारी, रविवारी दुपारी ३:४५ वाजता रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या मालगाडीच्या वॅगनमधून अचानक आगीचा भडका उडाला होता. क्षणातच आगीने राैद्ररुप धारण केल्यामुळे फलाटावरचे शेड जळाले. त्यावेळी तेलंगणा एक्स्प्रेस अगदी बाजुलाच उभी होती. आगीचे लोळ पाहून तेलंगणातील तसेच फलाटावरील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याने त्यांनी एकाचवेळी गाडीतून उतरण्यासाठी धावपळ सुरू केली होती. काहींनी चक्क उड्याही घेतल्या. परिणामी रेल्वे स्थानकावर एकच हल्लकल्लोळ निर्माण झाला होता. सुदैवाने यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफ, जीआरपी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना केल्याने आगीपासून प्रवाशांचा बचाव झाला अन् चेंगराचेंगरीसारखे भयंकर आक्रितही टळले.
वॅगनमधील पेट्रोल डिझेलचा उडालेला भडका तेलंगणा एक्सप्रेसच्या दारापर्यंत पोहचला असता तर काय घडले असते, याची कल्पना आल्याने शहारलेल्या रेल्वेच्या मुख्यालयाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, या घटनेला कुणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, त्याची चाैकशी सुरू केली आहे.
१० अधिकाऱ्यांची समिती -
चाैकशी करण्यासाठी मध्य रेल्वेचे एडीएमई राही तसेच एडीएसओ सरकार यांच्यासह रेल्वेचे एकूण पाच अधिकारी तसेच इंडियन ऑईलचे पाच अशा १० अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने ज्या ठिकाणाहून पेट्रोल डिझेल भरून मालगाडी निघाली, त्या रतलामपासून नागपूर ते तडालीपर्यंतची पाहणी करून अनेकांची चाैकशी केली आहे.
पाईप खराब, नटबोल्टही गायब
पेट घेणाऱ्या मालगाडीच्या वॅगनवरच्या झाकणाचे सिल खुले होते. गॅसकिट आणि पाईप कव्हर खराब होता. नटबोल्टही गायब होते, अशी धक्कादायक माहिती चाैकशीतून पुढे आली आहे. या अक्षम्य हलगर्जीपणाला कोण-कोण दोषी आहे, ते आता शोधले जात आहे.
या गंभीर प्रकाराला जे कुणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होईल. दुसरे म्हणजे, खबरदारीचा उपाय म्हणून यापुढे रेल्वेस्थानकावर ऑईल टँकर (वॅगन) आणली जाणार नाही. अजनी यार्डात क्रू चेंज केला जाईल.
विनायक गर्ग, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर