मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती का केले जात नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 07:44 PM2020-08-26T19:44:13+5:302020-08-26T19:48:49+5:30
नागपूरमध्ये ‘कोरोना रुग्णांचा आकडा २२ हजारांच्या पार तर मृतांची संख्या ८२५ वर गेली आहे. कोविड रुग्णांसाठी खासगी व शासकीय रुग्णालयात जागा नाही. भरती होण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमध्ये ‘कोरोना रुग्णांचा आकडा २२ हजारांच्या पार तर मृतांची संख्या ८२५ वर गेली आहे. कोविड रुग्णांसाठी खासगी व शासकीय रुग्णालयात जागा नाही. भरती होण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे महापालिकेची पाच रुग्णालये सुसज्ज असल्याचे सांगत ४६० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. वेळप्रसंगी या रुग्णालयांचा कोविड केअर सेंटर म्हणून वापर केला जाईल, असा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला होता. मात्र यातील फक्त एका रुग्णालयात ७ कोविड रुग्ण दाखल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उर्वरित रुग्णालयात एकही कोविड रुग्ण दाखल नाही. अशा परिस्थितीत रुग्णांनी उपचार कुठे घ्यावेत, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये भरती करून घेण्याची व्यवस्था का केली जात नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढत असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. उपचारासाठी लोक रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय आदींचा यात समावेश आहे. पाचपावली सूतिकागृह असल्याने येथे कोविड केअर सेंटर सुरू करणे योग्य होणार नाही. परंतु उर्वरित चार रुग्णालयांत अजूनही कोविड रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. तर इंदिरा गांधी रुग्णालयात फक्त कोविड लक्षणे असलेले ७ रुग्ण दाखल आहेत. मनपा प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना उपचार मिळत असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. महापालिका प्रशासनाने केवळ प्रसिद्धी मिळिवण्यासाठी संबंधित चार दवाखाने सज्ज असल्याचे सांगितले होते का, संबंधित दवाखान्यांमध्ये आवश्यक सुविधा का पुरिवल्या गेल्या नाहीत, असे प्रश्न उपिस्थत झाले आहेत. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. योगेन्द्र सवाई यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी माहिती देण्याचे टाळले.
मनपाची रुग्णालये व बेड क्षमता
इंदिरा गांधी रुग्णालय-१३०
पाचपावली -१३०
केटीनगर -१३०
आयसोलेशन -६०
आयुष रुग्णालय -४०
खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ८५० बेड उपलब्ध
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. योगेन्द्र सवाई यांनी खासगी रुग्णालयात १,८७६ बेड उपलब्ध असल्याची माहिती महापौरांनी घेतलेल्या बैठकीत दिली होती. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी सध्या ८५० बेड उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब चौकशी समितीच्या निदर्शनास आली.
मेयो, मेडिकलमध्ये क्षमतेच्या अर्धेच रुग्ण
कोविडची लागण झाल्यानंतर मेयो, मेडिकल रुग्णालयात दाखल होण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. वास्तविक मेयो, मेडिकल रुग्णालयांत प्रत्येकी ६०० बेडची व्यवस्था आहे. मेयो रुग्णालयात ३४० तर मेडिकलमध्ये २९५ इतके रुग्ण उपचार घेत असून क्षमतेच्या तुलतेन अर्धेच रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली होती.
खासगी रुग्णालयांनी बेड दुप्पट करावे
मनपाच्या पाच रुग्णालयांत गरज भासल्यास कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांती सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात इंदिरा गांधी रुग्णालयात जेमतेम ७ रुग्ण आहेत. इतर ठिकाणी एकही कोविड रुग्ण नाही. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला जातो. परंतु घरी स्वतंत्र व्यवस्था असेल तरच होम आयसोलेशन योग्य आहे. कोविड केअर सेंटमध्ये दाखल असल्यास वेळप्रसंगी तातडीने उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात सध्या ८५० बेडची व्यवस्था आहे. त्यांनी ती आठवडाभरात दुप्पट करावी. मेयो, मेडिकल रुग्णालयांनी १०० टक्के क्षमतेने रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे.
वीरेंद्र कुकरेजा, आरोग्य सभापती, मनपा