विदर्भात चारा छावण्या का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:58 AM2019-05-21T10:58:18+5:302019-05-21T11:00:05+5:30

मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे.

Why are not fodder camps in Vidarbha? | विदर्भात चारा छावण्या का नाहीत?

विदर्भात चारा छावण्या का नाहीत?

Next
ठळक मुद्देतीन तालुके दुष्काळग्रस्त पशुपालकांची चाऱ्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला नाही. पशुपालक चाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत. चारा नसल्याने जनावरांना तणस खायला घालत आहेत. काटोल, कळमेश्वर, नरखेड तालुक्यांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई आहे. पण पशुसंवर्धन विभाग चाराटंचाई नसल्याचा दावा करीत आहे. पशुपालकांची जनावरं जगविण्यासाठी होत असलेली होरपळ लक्षात घेता जिल्ह्यात चारा छावण्या का नाहीत, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.
काटोल, कळमेश्वर, नरखेड या तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. जमिनीतील पाण्याची पातळी हजार फुटावर गेली आहे. यंदा पशुपालकांकडे चाºयाचे उत्पादन घेणे शक्य झाले नाही. तालुक्यात जनावरांसाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांना तणस खाऊ घालावे लागत आहे. काटोल तालुक्यातील काही पशुपालकांशी चर्चा केली असता पहिल्यांदा अशी भीषण अवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी चारा छावण्यांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
येनवा येथील पशुपालक नितीन आगरकर म्हणाले की, विहिरींना पाणी नसल्यामुळे एका एकरात तयार केलेला चाºयाचा प्लॉट खराब झाला आहे. त्यामुळे जबलपूर येथून चण्याचे कुटार आणावे लागत आहे. आज दुधाला मिळणारे दर आणि चाऱ्याचा वाढता खर्च परवडणारा राहिलेला नाही. पण दुष्काळात जनावरं जगवायची आहेत. त्यासाठी खटपट सुरू आहे. कोंढाळी येथील पशुपालक पुरुषोत्तम हगवते म्हणाले की, यंदा दुष्काळामुळे गहू पेरला नाही. त्यामुळे गव्हांडा राहिलेला नाही. चारा नसल्याने भंडारा जिल्ह्यातून तणस बोलाविले आहे. पहिल्यांदा ९ हजार रुपये ट्रॉली तणस घेतले, आता १०,५०० रुपये ट्रॉलीने तणस घ्यावे लागत आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी तणस खाऊ घालण्याची वेळ आली आहे. डोरली येथील पशुपालक विलास जीवतोडे म्हणाले की, काटोल तालुक्यातील चारखांब, सोनखांब, ढवळापूर, मेंढेपठार अशा बहुतांश गावांमध्ये प्रचंड चाराटंचाई आहे. यावर्षीसारखी टंचाई पहिल्यांदा अनुभवत आहे. ऐपत असलेल्या पशुपालकांनी तणस आणून सोय केली आहे. पण काही पशुपालकांनी जनावरं विक्रीस काढलेली आहेत.
पशुसंवर्धन विभागाने दिलेले वैरण निकामी ठरले आहे.
पशुसंवर्धन विभागाने वैरणीच्या योजना राबविल्या. पण शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहचल्या. त्यात पाणी नसल्यामुळे वैरण उगवलेच नाही. चाऱ्याची भीषण टंचाई असताना पशुसंवर्धन विभाग कागदावर टंचाईच नसल्याचे दाखवित आहे. पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पं.स. स्तरावर पशुधन अधिकारी असतानाही दुष्काळाचे नियोजन झाले नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १०० ट्रक तणस जनावरांचे खाद्य म्हणून येत आहे.

Web Title: Why are not fodder camps in Vidarbha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती