भिडे, एकबोटेला अद्याप अटक का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:23 PM2018-01-31T23:23:36+5:302018-01-31T23:26:40+5:30
१ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे. सरकारवर आता भरवसा नाही, त्यामुळे आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून या प्रकरणासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नेमण्यात यावी यासाठी दलाच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती अॅड. स्मिता कांंबळे यांनी पत्रपरिषदेतून दिली.
अॅड. कांबळे म्हणाल्या, या घटनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची व संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आज या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही कुठल्याही प्रकारची चौकशी नेमण्यात आलेली नाही. उलट आंदोलनात सहभागी झालेल्या आंबेडकरी समाजातील निर्दोष युवकांना अटक करून त्यांचे भविष्य नासविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोपही अॅड. स्मिता कांबळे यांनी केला. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यासह केंद्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, प्रधानमंत्री, राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय न्यायालयातही हे प्रकरण नेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला अमन कांबळे, विश्वास पाटील, राजेश लांजेवार, जितेंद्र घोडेस्वार, घनश्याम फुसे, सुनील जवादे आदी उपस्थित होते.