स्तन कर्करोगाची भीती बाळगता कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:36 AM2017-10-05T01:36:16+5:302017-10-05T01:36:19+5:30
भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही. जनजागृतीचा अभाव असल्याने ही भीती निर्माण होते. या भीतीमुळे आवश्यक असलेल्या तपासण्या करण्यास कुणी तयार होत नाही आणि ही भीतीच तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. या आजाराने मृत्यूचे प्रमाण वाढले हे खरे आहे, मात्र याचे कारण आजारामुळे नाही तर आजाराचे उशिरा निदान होत असल्याने मृत्यूची शक्यता वाढत असल्याची माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेवरून संपूर्ण आॅक्टोबर महिना स्तन कर्करोगाबाबत जनजागृती म्हणून पाळला जात आहे. या आजाराशी झुंजणाºया महिलांसाठी गुलाबी रंग प्रतीक म्हणून संबोधला जात असून या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. डॉ. रोहिणी पाटील यांनीही स्तन कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: या आजाराचा विळखा सहन केला आहे. त्या सांगतात की डॉक्टर असूनही त्यावेळी भीती वाटली होती. मात्र जागृतीमुळे व लवकर निदान झाल्याने यातून सहज बाहेर पडणे शक्य आहे, ही जाणीव मला होती. लवकर निदान आणि योग्य उपचाराने त्यांनी आजारावर मात केली. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दर आठमधून एका महिलेला स्तन कॅन्सर असतो. २०१६ च्या आकडेवारीनुसार भारतात यावर्षी स्तन कर्करोगाने ७६००० महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून दीड लाख नवीन रुग्णांची नोंदही करण्यात आली आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. नागपूर शहराचा विचार केल्यास सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण हे ४० टक्के आहे. ही परिस्थिती भयावह आहे, मात्र त्याहीपेक्षा जनजागृतीचा अभाव हे अधिक चिंतेचं कारण आहे. कारण मृत्यूच्या कारणाकडे लक्ष दिल्यास यापैकी ८० टक्के महिलांचे मृत्यू कर्करोगाचे निदान उशिरा लागल्याने झाले आहेत. निदान उशिरा लागल्यास उपचाराला प्रतिसाद मिळणे कमी होते. त्यामुळेच या आजाराला ‘किलर डिसीज’ म्हटले जाते.
स्तन कर्करोगाचा धोका टाळणे शक्य
आपल्याकडे भीतीपोटी आणि जागृतीच्या अभावामुळे आजाराक डे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र भीती बाळगण्याचे कुठलेही कारण नाही. डॉ. पाटील यांनी सांगितले, आय ब्रेस्ट एक्झामिनेशन (आयबीई) ही पाच मिनिटात केली जाणारी तपासणी आहे. ही टेस्ट २० वर्षे वयोगटानंतरच्या प्रत्येक महिलेने करून घेणे अत्यावश्यक आहे. काही वर्षाअगोदर आजाराचा धोका ४० वर्षे वयोगटानंतर होता, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही धोका वाढल्याचे त्या म्हणाल्या. बीएसई टेस्टमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास मेमोग्रॉफी टेस्ट केली जात असून यानंतर औषधोपचार सुरू केला जाऊ शकतो. याशिवाय ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन (बीएसई) ही तपासणी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिला स्वत:च करू शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या साध्या तपासण्या प्रत्येक वर्षी वेळ काढून केल्यास धोका सहज टाळता येऊ शकतो असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.
शासनाने पुढाकार घेणे आवश्यक
देशात स्तन कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही स्थिती लक्षात घेता जनजागृती आणि उपाययोजनांबाबत शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहेत. अगदी ग्राम स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात मेमोग्रॉफी टेस्टची साधने उपलब्ध करून तज्ज्ञांमार्फत महिलांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे निदान लवकर लागून उपचार करणे सोपे होईल, असे मत डॉ. रोहिणी पाटील यांनी व्यक्त केले.