गंटावार दाम्पत्याला आयुक्तांचे अभय कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:25 AM2020-07-03T00:25:53+5:302020-07-03T00:27:40+5:30
आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार दाम्पत्याला अभय कशासाठी, असा सवाल मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालू गंटावार यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. तसेच महापालिका आयुक्तांकडे पुराव्यानिशी फेब्रुवारी महिन्यात गंटावार यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. परंतु अद्याप गंटावार दाम्पत्याच्या विरोधात कुठलीही कारवाई केलेली नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार दाम्पत्याला अभय कशासाठी, असा सवाल मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
महापालिका समिती विभागाच्या २१ मार्च २०१६ रोजीच्या आदेशानुसार महापालिकेत कार्यरत कुठल्याही डॉक्टरला खासगी व्यवसाय करता येत नाही. असे असतानाही गंटावार कोलंबिया नर्सिंग हॉस्पिटल चालवीत आहे.
महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा १९४९ अंतर्गत कलम ५ नुसार दिलेल्या निर्देशानुसार शासकीय सेवेत कार्यरत डॉक्टरांना कुठल्याही स्वरूपात व्यक्तिगत रुग्णालय चालविता येत नाही असे असतानाही गंटावार कोलंबिया नर्सिंग होम चालवित आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम १९८९ च्या नियम ५अंतर्गत शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती राजकीय संघटना चालवू शकत नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही. असे असतानाही शालू गंटावार 'मध्य प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस पक्षाच्या सक्रिय पदाधिकारी आहे. त्यांनी शालू पदराम या नावाने काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. याबाबतचे पुरावे त्यांच्या फेसबुकवर उपलब्ध आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. याबाबतचे पुरावे आयुक्तांकडे दिले आहे. अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.
गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या चौकशीत या दाम्पत्याने दोन कोटीपेक्षा अधिक रुपयाची मालमत्ता बाळगल्याची नोंद आहे यानंतरही आयुक्तांनी गेल्या २४ तासात त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
.... तर ऑडिओ क्लिप जाहीर करणार
पुरावे दिल्यानंतरही मनपा आयुक्त डॉ. गंटावार दाम्पत्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करत नसेल तर गंटावार आणि आयुक्त यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर करू ,असा इशारा दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिला.