'एमकॉम'च्या निकालाला ९७ दिवस का लागले ? विधीसभा सदस्याचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 09:25 PM2020-02-24T21:25:49+5:302020-02-24T21:27:24+5:30
‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
‘एमकॉम’च्या तृतीय सत्राची परीक्षा १८ नोव्हेंबर रोजी संपली. परीक्षा आटोपून दोन महिने सरल्यावरदेखील निकाल जाहीर झाला नव्हता. अखेर २२ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला. ४ मार्च रोजी लगेच पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यावर प्रवीण उदापुरे यांनी आक्षेप घेतला आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल ३० दिवसाच्या आत लागणे आवश्यक आहे. परंतु १८ नोव्हेंबरला संपलेल्या या परीक्षेचा निकाल लागण्यास तब्बल ९७ दिवसाचा कालावधी लागला आहे. विशेष म्हणजे फेरपरीक्षा लगेच ४ मार्चपासून आयोजित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. फेरपरीक्षेचा तसेच पुनर्मूल्यांकनाचा अर्ज कसा करावा या चिंतेत विद्यार्थी सापडले आहे. यासंबंधात जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उदापुरे यांनी केला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात यावी. तसेच जर पुरवणी परीक्षा एक महिना पुढे ढकलली नाही तर कुलगुरूंना घेराव करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.