भाजपने एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री का केले नाही?; राष्ट्रवादीचा सवाल
By कमलेश वानखेडे | Published: June 27, 2023 06:13 PM2023-06-27T18:13:38+5:302023-06-27T18:18:52+5:30
भाजपचे ओबीसी प्रेम म्हणजे पोलिटिकल नौटंकी
नागपूर : भाजपचे ओबीसी प्रेम हे केवळ पोलिटिकल नौटंकी आहे. राज्यात भाजप-सेना युतीचा सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी नेते असलेले एकनाथ खडसे यांना डावलून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री कसे झाले, कामठीत बावनकुळे यांचे तिकीट का कापण्यात आले, पंकजा मुंडे यांची पक्षात दमकोंडी का सुरू आहे, असे सवाल करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
कुंटे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर तीनदा ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले. दोनदा उपमुख्यमंत्रीपद दिले. भाजपने तर शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करताना उपमुख्यमंत्रीपदही ओबीसी नेत्याला दिले नाही. आजही राष्ट्रवादीचे विदर्भातील ९० टक्के जिल्हाध्यक्ष ओबीसी समाजाचे असल्याचे सांगत भाजपचे किती संघटन मंत्री ओबीसी आहेत, ते जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी दिले. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यामुळे भाजपने पक्षात ओबीसी चेहऱ्यांची आयात सुरू केली आहे. त्यांचे ओबीसी प्रेम म्हणजे पोलिटिकल नौटंकी आहे, अशी टीकाही कुंटे पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा २९ जुलै रोजी नागपुरात सत्कार आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी आ. दीनानाथ पडोळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, श्रीकांत शिवरकर, जावेद हबीब, महेंद्र भांगे, श्रीकांत आंबुलकर, नितीन भटारकर आदी उपस्थित होते.
मतविभाजनासाठी बीआरएस महाराष्ट्रात
- राज्यात महाविकास आघाडीला भक्कम बहुमत मिळणार असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. याचा धसका भाजपने घेतला आहे. त्यामुळे गेल्यावेळी जसे मतविभाजनासाठी हैद्राबादवरून एमआयएमला आणण्यात आले होते, त्याच धर्तीवर आता भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ला आणण्यात आले आहे, असा आरोप कुंटे पाटील यांनी केला. शेतकरी आंदोलनात अपयशी ठरलेल्या नेत्यांना हाताशी धरून बीआरएस डाव खेळू पाहत आहे, पण शेतकरी यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.