कामठीमध्येच ‘त्या’ महिलेची प्रसूती का झाली नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:06+5:302021-09-10T04:12:06+5:30
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील जमिनीवरच प्रसूती होऊन मृत बाळाच्या जन्म प्रकरणाची पाच सदस्यांकडून चौकशी सुरू झाली ...
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील जमिनीवरच प्रसूती होऊन मृत बाळाच्या जन्म प्रकरणाची पाच सदस्यांकडून चौकशी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कामठी उपजिल्हा रुग्णालयाने या महिलेची प्रसूती का केली नाही, तिला नागपूरच्या डागा रुग्णालयात का पाठविले, या प्रवासादरम्यान गर्भवतीची प्रकृती आणखी खालावून पोटातील बाळाचा मृत्यू तर झाला नसावा, अशी शंका वर्तवली जात आहे.
राणी वासनिक त्या प्रसूत महिलेचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. तिच्या नातेवाइकांनी प्रथम कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले; परंतु राणीची प्रकृती गंभीर असल्याचे पाहता तेथील डॉक्टरांनी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रात्री ११ वाजेच्या सुमारास राणी ही रुग्णालयात दाखल झाली; परंतु तेथील डॉक्टरांनी तिला भरती करून न घेता नागपूरच्या डागा रुग्णालयात पाठविले. कामठी ते डागा हे जवळपास १ तासाचे अंतर आहे. कामठीच्या डॉक्टरांनी तत्परता दाखवून तिथेच जर प्रसूती केली असती तर राणीला पुढे सोसाव्या लागलेल्या वेदना व मृत बाळाच्या घटनेला थांबवता आले असते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकरणात राणीच्या नातेवाइकांनी डागा रुग्णालयात झालेल्या हलगर्जीपणाची पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, तर रुग्णालयातील परिचारिका व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रसूती सुरू असताना नातेवाइकांनी व्हिडिओ काढल्याचा व रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाची तक्रार विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्याकडेही झाल्याची माहिती आहे.
-पाच सदस्यांची चौकशी समिती
डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांनी या घटनेला गंभीरतेने घेऊन पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.
-चौकशीत त्रुटी आढळल्यास नव्याने चौकशी करणार
डागा रुग्णालयाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. समितीचा अहवाल आल्यावर त्याची तपासणी केली जाईल. यात जर त्रुटी आढळल्यास नवीन चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली जाईल.
-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर