तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 07:53 PM2023-02-25T19:53:08+5:302023-02-25T19:53:34+5:30

Nagpur News बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे.

Why do heart attacks occur at a young age? | तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

googlenewsNext

 

नागपूर : बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृदय कमकुवत होणे ही तरुणाईसाठी चिंतेची आणि काळजीची बाब आहे. व्यसन, जीवनशैलीत झालेले बदल, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी न घेणे या बाबी यासाठी कारणीभूत ठरत आहे. ताण (स्ट्रेस), धूम्रपान (स्मोकिंग), साखर (शुगर), मिठ (सॉल्ट) आणि बैठी जीवनशैली (सिडेंट्री लाइफस्टाइल) हे हृदयाचे पाच शत्रू आहेत. या पाच शत्रूंना दूर ठेवले तर हृदयविकाराला दूर ठेवता येते.

 

..अशी आहेत लक्षणे

- डाव्या हातात जळजळ, छातीत, पाठीत डावीकडे जळजळ, खांदेदुखी, घाम येणे, दम लागणे, धाप लागणे प्राथमिक संकेत असतात.

 

- तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे

अनियमित जीवनशैली : नोकरी व कामाच्या ताणामुळे जीवनशैली अनियमित झाली आहे. जेवणाची, झोपण्याची वेळ निश्चित नाही. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम करणे, सोशल मीडियाचे व्यसन यामुळे बहुतांश तरुण हे मध्यरात्री झोपतात. पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

चुकीचा आहार : हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयरोगाची समस्या उद्भवते.

- व्यायामाचा अभाव : दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. त्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारासारख्या समस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते.

मानसिक ताण : मानसिक ताण हे नकळत आपल्या हृदयावर परिणाम करतात.

तरुणांनी काय काळजी घ्यावी?

- पुरेशी झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत जागरण करून मोबाइलवर सोशल मीडिया पाहत राहणे बंद करा.

- संतुलित आहाराचे सेवन करा. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड खाणे टाळा. जेवण करताबरोबर झोप घेणे टाळा.

- नियमित व्यायाम केल्याने शरीरातील रक्तसंक्रमण सुरळीत राहते.

- शरीरावरून सुदृढ दिसत असले तरी त्यात आजार दडलेला असू शकतो. त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांनी आवश्यक तपासण्या कराव्या.

- तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल तर तो घालविण्यासाठी मित्रांशी बोलणे, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे असे उपाय योजून मन रमविण्याचा प्रयत्न करा.

 

‘नो युवर नंबर’ 

- वयाची तिशी ओलांडलेल्या तरुणांना वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ‘नो युवर नंबर’चा सल्ला आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक तरुणाने नियमित तपासणी करून आपले वजन, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. युवकांनी आहार व विहारावर लक्ष द्यावे. संतुलित आहार घ्यावा. आठवड्यातून किमान १५० मिनिट पायी चालावे. धूम्रपान, मद्यप्राशन यासारखी व्यसने टाळावी. छातीत जळजळ झाली तर ती ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

- डॉ. प्रशांत जगताप

हृदयरोग तज्ज्ञ

Web Title: Why do heart attacks occur at a young age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य