भारतीय गायकांना सन्मान का मिळत नाही?
By admin | Published: May 10, 2015 02:19 AM2015-05-10T02:19:31+5:302015-05-10T02:19:31+5:30
भारतात अनेक प्रतिभावंत कलावंत आहे. भारतीय कलावंतांमध्ये वैविध्यपूर्णताही आहे.
नागपूर : भारतात अनेक प्रतिभावंत कलावंत आहे. भारतीय कलावंतांमध्ये वैविध्यपूर्णताही आहे. पण आपल्याच कलावंतांची उपेक्षा करुन पाकिस्तानच्या कलावंतांना भारतात प्रोत्साहन देण्यामागे कुठली शक्ती काम करते आहे, ते समजण्यापलिकडे आहे. पाकिस्तानी कलावंतांना भारतीय कलावंतापेक्षा जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतो आहे. आपल्या देशातल्या प्रतिभावंत गायकांना हा सन्मान का दिला जात नाही, असा संतप्त प्रश्न ज्येष्ठ गायक मोहम्मद हुसेन, अहमद हुसेन यांनी केला.
सुप्रसिद्ध गझल व भजन गायक उस्ताद मोहम्मद हुसेन आणि अहमद हुसेन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने रविवारी सकाळी ६ वाजता ब्रह्मनाद या प्रात:कालीन सभेत करण्यात आले आहे. यात प्रात:कालीन रागांवर आधारित रचना ते सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम केंद्राच्या मुक्तांगण परिसरात होईल. हुसेन बंधूंनी आतापर्यंत एकही कार्यक्रम वेगवेगळा केला नाही. प्रत्येक कार्यक्रमात ते एकमेकांसह राहिले आहेत. आजपर्यंत मुलाखतीही त्यांनी एकत्रितच दिल्या आहेत. यावेळी अहमद हुसेन म्हणाले, जयपूर घराण्याची परंपरा ते चालवित आहेत. त्यांच्या पूर्वजांनीही संगीताचाच अभ्यास केला. संगीताची आराधना करणारी त्यांची पाचवी पिढी आहे. त्यामुळेच प्रत्येक पिढीत त्यांचा पिता-पुत्राचा संबंध गुरु आणि शिष्याचा राहिला आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून संगीताची आराधना घरात असल्याने आज आमच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य गायन करतो. पिता अफझल हुसेन यांच्यापासून या दोन्ही बंधूंनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. तेच त्यांचे गुरु होते. सध्या त्यांचा मुलगा व भाचा त्यांचे शिष्य आहेत. (प्रतिनिधी)