देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो ? पावसाची पाठ, दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 11:33 AM2021-07-07T11:33:46+5:302021-07-07T11:34:14+5:30

Nagpur News पावसाअभावी कोवळी पिके सुकण्याच्या बेतात असून, दुबार पेरणीच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

Why does God take such a test every year? The back of the rain, the crisis of double sowing | देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो ? पावसाची पाठ, दुबार पेरणीचे संकट

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो ? पावसाची पाठ, दुबार पेरणीचे संकट

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी संकटात तर दुबार पेरणीसाठी खतही मिळणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जुलै महिना उजाडला असला तरी पाऊस मात्र रुसल्यासारखा आहे. मागील ४-५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी कोवळी पिके सुकण्याच्या बेतात असून, दुबार पेरणीच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

जिल्ह्यात सरासरी पाऊस चांगला पडला असला तरी पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस नाही. पावणेपाच लाख हेक्टर कृषी क्षेत्रापैकी फक्त ३,५४,६२३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. उधारीवर पाणी घेऊन पऱ्हे जगविणे सुरू आहे.

आतापर्यंत अपेक्षित पाऊस -२१५.४ मि.मी.

प्रत्यक्ष झालेला पाऊस - २१३.६ मि.मी.

आतापर्यंत झालेली पेरणी - ३,५५,७०५.८८ हेक्टर

 कापसाचे क्षेत्र वाढले, मात्र पावसाचे संकट

जिल्ह्यात कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र २,०९,२४९ हेक्टर आहे. मागील वर्षी १,९१,९०५ हेक्टरवर असलेला कापसाचा पेरा यंदा २ लाख ३७५ हेक्टरवर पोहोचला आहे. त्या तुलनेत सोयाबीनचा पेरा मागे पडला आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १,१०,५३२ हेक्टर असले तरी यंदा पेरा फक्त ८९,४९९ हेक्टर आहे. मागील वर्षीपेक्षाही तो जवळपास ४ हजार हेक्टरने कमी आहे. धान रोवणीला पावसाची प्रतीक्षा आहे. फक्त ३ हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे. कडधान्याच्या पेरणीचे क्षेत्र गतवर्षी ११७ हेक्टर होते. यंदा फक्त ८८ हेक्टर आहे.

.तर दुबार पेरणी

जिल्ह्यातील परिस्थिती धोक्यात आहे. धानासाठी शेतकऱ्यांचे पऱ्हे तयार आहेत. मात्र, रोवणीलायक पाऊसच नाही. फक्त १३ टक्के रोवण्या झाल्या आहेत. पऱ्हाटी आणि सोयाबीन चांगले उगवले असले तरी आता पावसाची गरज आहे. जमिनीच्या ओलाव्यावर पिके तग धरून आहेत. येत्या ४-५ दिवसांत पुरेसा पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते.

 

यंदा हवामान खात्याने पाऊस भरपूर सांगितला होता. आम्ही पहिल्या पावसावर विश्वास ठेवून पेरण्या केल्या असल्या तरी आता पावसाअभावी पिके सुकण्याची शक्यता वाढली आहे. लवकर पाऊस आला नाही तर पिके सुकू शकतात.

- विनोद गायकवाड, तुरकमारी, ता. हिंगणा

आधीच आम्ही शेतकरी आर्थिक संकटात आहोत. अशातच निसर्गही साथ देत नसल्याने संकट निर्माण झाले आहे. उधारीवर स्प्रिंकलर आणून पिके जगविणे सुरू आहे. एक-दोन दिवसांत पावसाची गरज आहे.

- रितेश टेंभे, खानगाव, ता. काटोल

दुबार पेरणीची स्थिती नाही. हवामान विभागाने ४-५ दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी या दिवसात आंतरमशागतीची कामे उरकून घ्यावीत. चऱ्या काढून घ्याव्यात. यामुळे ओलावा टिकून राहील व येणाऱ्या पावसात पिके सडणार नाहीत.

- मिलिंद शेंडे, अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...

Web Title: Why does God take such a test every year? The back of the rain, the crisis of double sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.