सरकारचा गणरायाच्या मुखदर्शनाला विरोध का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:29+5:302021-09-10T04:13:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता सार्वजनिक गणेश मंडळातील गणेशमूर्तींच्या मुखदर्शनाला बंदी घालण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता सार्वजनिक गणेश मंडळातील गणेशमूर्तींच्या मुखदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. यावरून भाजप महिला आघाडीने मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले असून घरात बसून राज्यकारभार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का, असा सवाल महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी केला आहे.
राज्य शासनाच्या नाकर्त्या कारभारामुळे महिलांवर अत्याचार वाढले असून मंत्र्यांच्या दबावापोटी गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत नाही. जनतेने घरात बसावे, अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही. त्यामुळे महिलांना स्वतःचे रक्षण करावे लागणार आहे, गणेशोत्सवाच्या काळात महिला मोर्चाकडून राज्यभरात 'साकडे' आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत बंद असलेल्या मंदिरांसमोर जाऊन गणेशचरणी महिला अत्याचाराविरोधातील संघर्षासाठी महिलांना बळ दे, असे गणरायासमोर साकडे घालण्यात येणार आहे, असे जिचकार यांनी सांगितले.