नागझिऱ्यात का थांबत नाही वाघ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 12:54 AM2021-08-01T00:54:26+5:302021-08-01T00:54:59+5:30
Nagzira, tiger महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी नंदनवनच ठरले आहे. मात्र विदर्भातील एक अभयारण्य वाघाला फारसे भावले नाही. ताडाेबा, पेंच वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघ थांबायला तयार नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी नंदनवनच ठरले आहे. मात्र विदर्भातील एक अभयारण्य वाघाला फारसे भावले नाही. ताडाेबा, पेंच वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघ थांबायला तयार नाहीत. घनदाट जंगल असूनही केवळ ८ वाघांचा अधिवास येथे आहे. त्यामुळे वाघ का थांबत नाहीत, हा अभ्यासाचा विषय झाला आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते ताडोबा अभयारण्य हे एकत्रित (कॉम्पॅक्ट) आहे आणि बफर झोनमध्ये मानवी वस्त्या तुटक असल्याने वाघांना अधिवासाचा मोठा एरिया मिळतो. याउलट नवेगाव-नागझिरा एकत्रित व समुचित नाही. २५० चौ. किमीचा नवेगाव ब्लॉक वेगळा तर ४०० चौ.किमी.चा नागझिरा ब्लॉक वेगळा पडतो. या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये असलेल्या बफर झाेनमध्ये तब्बल १८५ गावे आहे. मोठ्या प्रमाणात असलेली मानवी वस्त्या हा वाघांच्या अधिवासाचा मोठा अडथळा आहे. याशिवाय अधिवासात विविध विकासकामे तसेच रेल्वे व रस्त्यांचे जाळे मोठे असल्यानेही वाघांसाठी अडचणीचे हात असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे अभयारण्य लहान-मोठ्या टेकड्यांनी व्यापले आहे. जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली आहे पण कदाचित अधिवास कमी पडत असल्यानेच वाघांची संख्या कमी असल्याची शक्यता आहे. मात्र नेमके कोणते कारण कमतरतेसाठी कारणीभूत आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे. इतर भागातील वाघ या अभयारण्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आला होता; पण पुढे ताे रखडला.
काेराेनामुळे रखडला अभ्यास
नवेगाव-नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रानकुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाघ येथे थांबत नसल्याचे बोलले जाते. याबाबत वन्यजीव वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात अभ्यास सुरू आहे. मात्र काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून हे अभ्यासकार्य रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली. आता पुन्हा ताे सुरू हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.