शाळा-महाविद्यालयांना तात्पुरता ‘ब्रेक’ का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:06+5:302021-02-23T04:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत ‘कोरोना’चे आकडे वाढत असताना शाळा-महाविद्यालयांबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. एकूण स्थिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत ‘कोरोना’चे आकडे वाढत असताना शाळा-महाविद्यालयांबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. एकूण स्थिती पाहता शाळा-महाविद्यालयांना काही दिवस ‘ब्रेक’ देण्याची आवश्यकता असल्याचा सूर दिसून येत आहे. प्रशासनाकडून कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नसून आणखी ‘कोरोना’बाधित वाढण्याची प्रतीक्षा करणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील शाळांना सुरुवात झाली. सद्यस्थितीत पाचवीपासूनच्या पुढील इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग होत आहेत. दुसरीकडे महाविद्यालयांनादेखील सुरुवात झाली आहे. मात्र अचानकपणे ‘कोरोना’बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आणि पालकांसमोरील संभ्रम वाढला. मुलांना शाळा-महाविद्यालयात पाठवावे की नाही, अशा प्रश्न त्यांना पडला आहे. कितीही काळजी घेतली तरी शाळा-महाविद्यालयात खबरदारीचे उपाय घेतले जातात की नाही, याची त्यांना काळजी आहेच. राज्यातील काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयातील प्रत्यक्ष वर्गांवर तात्पुरता ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. मात्र नागपुरात प्रशासनाकडून यासंदर्भात कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
महाविद्यालयांकडूनच ‘ऑनलाईन’साठी पुढाकार
वर्गखोल्यात ५० टक्केच उपस्थिती असावी अशी अट असली तरी, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण होत आहे. अशास्थितीत काही महाविद्यालयांनी ‘ऑफलाईन’ऐवजी ‘ऑनलाईन’ वर्गांसाठी पुढाकार घेतला आहे. केवळ शिक्षकांना महाविद्यालयात बोलविण्यात येत असून विद्यार्थ्यांना घरूनच ‘ऑनलाईन’ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.