कोरोनातही उद्घाटनाचा अट्टाहास कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:07 AM2021-03-14T04:07:22+5:302021-03-14T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळपास जात आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शनिवार-रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळपास जात आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शनिवार-रविवारी शहरातील बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवली जात आहेत. १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी धार्मिक कार्यक्रम, उद्घाटन व भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. कोरोना संक्रमणाचा धोका वाढला असताना हा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प असल्याने नगरसेवक व पदाधिकारी अस्वस्थ आहेत. प्रभागातील नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही अॅक्टिव्ह आहोत, असे भासविण्यासाठी त्यांनी धार्मिक कार्यक्रम, उद्घाटन व भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. यातून कोरोना संक्रमण होईल, याचे भान राहिलेले नाही. नागरिकांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पदाधिकारी स्वत: मात्र नियमांचे पालन करीत नाहीत. मग आम्हालाच प्रतिबंध कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोरोनामुळे लग्नसमारंभाला मंगल कार्यालयात मोजक्या लोकांच्या उपस्थितीतही परवानगी नाही. घरगुती समारंभ करा, असा सल्ला प्रशासनाकडून दिला जाते. दुसरीकडे महाशिवरात्रीला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत नारी घाटावर भगवान शंकराची मूर्ती स्थापित करण्यात आली. यावेळी नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, भावना लोणारे, माजी नगरसेविका सविता मनोज सांगोळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...
क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन
धंतोली झोन क्षेत्रातील कुकडे ले-आऊट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांच्या हस्ते आर. एल. एलेवन क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, अकॅडमीचे प्रमुख ऋषी लोधी, झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, वंदना हिरेखन यांच्यासह २५ ते ३० खेळाडू उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाप्रसंगी काही जणांच्या तोंडाला मास्क नव्हते. असेच धार्मिक कार्यक्रम, पक्षाच्या बैठका सुरू आहेत. यातून संक्रमणाचा धोका नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
.........