का दुर्मिळ होत आहे गावरान आंबा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:23 PM2020-05-23T20:23:03+5:302020-05-23T20:27:30+5:30
उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.
लॉकडाऊनच्या काळातही वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची मोठी आवक शहरात झाली आहे. बैगनफली, केशर, हापूस, लंगडा, दशेहरी अशा प्रजातींच्या आंब्यांनी रस्ते आणि बाजार सजले आहेत. मात्र यात गावरान आंबा कुठेही नाही. जाणकारांच्या मते, यावर्षी वैदर्भीय गावरान आंब्याचे उत्पादन न होण्याची अनेक कारणे आहेत. हवामानातील बदल त्यासाठी कारणीभूत आहे. वृक्ष व पक्षी अभ्यासक नितीन मराठे यांनी सांगितले, यावर्षी भर उन्हाळ्यातही पावसाने नियमित हजेरी लावली आहे. आंब्याला ऐन मोहर आलेला असताना पावसाळी वादळवाºयाने हा मोहर झडला शिवाय लहान कैºयाही झडून पडल्या. त्यामुळे आंब्याचे उत्पादन हवे तसे झाले नाही. शहरातच नाही तर गावातही लोकांना हवा तसा आंब्याचा आस्वाद घेता आला नाही. हे यावर्षी आंबा कमी होण्याचे नैमित्तिक कारण आहे. मात्र गावरान आंब्याबाबत निर्माण झालेली उदासीनता हे दूरवर परिणाम करणारे कारण दुर्लक्षित करता येणार नाही, असे मत मराठे यांनी व्यक्त केले.
आमराईच उरली नाही
नितीन मराठे यांनी गेल्या काही वर्षांतील अभ्यासाअंती नोंदविलेले निरीक्षण चिंता करण्यासारखे आहे. पूर्वी बैलजोडीच्या मदतीने शेतीची कामे व्हायची. नांगरणी, वखरणी उन्हाळ्यात व्हायची. काम करून थकल्यानंतर सावलीत जेवण करता यावे, आराम करता यावा म्हणून एक तरी आंब्याचे झाड शेतात असायचे. पण ट्रॅक्टरने शेतीची कामे सुरू झाल्यानंतर हीच विशाल झाडे अडचणींची झाली. झाडाच्या सावलीत पिके येत नाहीत म्हणून या झाडांची कटाई झाली. गावोगावी आमराईत शेकडो झाडे असायची. मात्र कृषिमालासाठी पेट्या बनवायला आंब्याच्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठी वृक्षतोड करून ती विकण्यात आली. त्यामुळे आमराई शिल्लक राहिली नाही. म्हणूनच येत्या काळात गावरान आंबे दुर्मिळ होतील, अशी भीती मराठे यांनी व्यक्त केली.
आंबा लागवडीला प्रोत्साहन मिळावे
शासनाने शेतावर आंब्याचे झाड असलेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षातून एकदा सबसिडी द्यावी, जेणेकरून शेतकरी आंब्याचे जतन करतील. गावरान आंब्याला फळे यायला बरीच वर्षे लागतात. त्यामुळे लवकर फळे देणाऱ्या हायब्रीड प्रजातीला प्राधान्य दिले जाते. वृक्षारोपण कार्यक्रमात कॅशिया, गुलमोहर, सप्तपर्णी अशा निरुपयोगी विदेशी वृक्षांची लागवड करण्यापेक्षा आंब्याची लागवड करावी, अशी गरज मराठे यांनी व्यक्त केली.