रुई उत्पादनाचा ‘डेटा’ देणार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 02:42 PM2021-03-15T14:42:08+5:302021-03-15T14:43:26+5:30

Nagpur News रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा सांगितला जाताे. हा ठराविक आकडा रुईचा बाजार कायम स्थिर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरताे, अशी माहिती रुई व कापड उद्याेगातील तज्ज्ञांनी दिली.

Why give ‘data’ of cotton production? | रुई उत्पादनाचा ‘डेटा’ देणार काेण?

रुई उत्पादनाचा ‘डेटा’ देणार काेण?

Next
ठळक मुद्देबाजार स्थिर ठेवण्यावर भर प्रभावी शासकीय यंत्रणा हवी

सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशात पाच हजार, तर महाराष्ट्रात १,६०० जिनिंग - प्रेसिंग आहेत. या जिनिंग - प्रेसिंगमधून दर महिन्याला रुईच्या किती गाठी तयार केल्या जातात, याची निश्चित आकडेवारी प्राप्त हाेत नाही. त्यामुळे चालू हंगामात रुईच्या गाठींचे नेमके किती उत्पादन झाले, याची माहिती कापड उद्याेगांना मिळत नाही. यासाठी प्रभावी शासकीय यंत्रणादेखील नाही. दुसरीकडे, रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा सांगितला जाताे. हा ठराविक आकडा रुईचा बाजार कायम स्थिर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरताे, अशी माहिती रुई व कापड उद्याेगातील तज्ज्ञांनी दिली.

जिनिंग - प्रेसिंग मालक रुईच्या गाठींची विक्री 'सीसीआय' व कापड उद्याेगांना करतात. देशातील रुईच्या गाठींचे उत्पादन हे कापसाच्या उत्पादनावर ठरविले जात असून, याचा अंदाज दरवर्षी सप्टेंबर - ऑक्टाेबरपासून व्यक्त व्हायला सुरुवात हाेते. मात्र, प्रतिकूल वातावरण, किडींचा प्रादुर्भाव व अन्य कारणांनी कापसाच्या उत्पादनात येणारी घट विचारात घेतली जात नाही. रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा सांगितला जात असल्याने कापड उद्याेग ताेच आकडा ग्राह्य धरून रुईच्या गाठींची खरेदी व साठा करण्याचे नियाेजन करते. त्यामुळे रुईच्या बाजारात कायम स्थिरता राहात असून, कापसाच्या बाजारात फारसी तेजी येत नाही, असे जिनिंग - प्रेसिंग मालकांनी खासगीत सांगितले.
देशभरातील जिनिंग - प्रेसिंगला 'डीआयसी' (जिल्हा उद्याेग केंद्र) मार्फत सबसिडी दिली जाते. त्यामुळे सर्व जिनिंग - प्रेसिंगसाेबत 'डीआयसी'चा संबंध येताे. शासनाने प्रत्येक जिनिंग - प्रेसिंगला त्यांनी दर महिन्याला रुईच्या किती गाठींचे 'प्रेसिंग' केले, याची माहिती ठेवून ती 'डीआयसी' कार्यालयांना गाेळा करायला लावली तर ही समस्या सहज सुटू शकते आणि देशभरात रुईच्या किती गाठींचे उत्पादन झाले, याची माहिती एका‘क्लिक'वर उपलब्ध हाेऊ शकते, अशी माहिती प्रकाश व्हाईट गाेल्ड जिनिंग - प्रेसिंगचे मालक ओम डालिया यांनी दिली.
 

आकडेवारीतील तफावत

देशात रुईच्या गाठींचे किती उत्पादन हाेणार, याबाबत माेठी तफावत दिसून येते. चालू हंगामात देशात ३७० लाख रुईच्या गाठींचे उत्पादन हाेणार असल्याची माहिती केंद्र शासनाचे वस्त्राेद्याेग मंत्रालय आणि सीसीआयच्या सुत्रांनी दिली. दुसरीकडे, 'सीआयए' (काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया)च्या सुत्रांनी देशात ३५८.५० लाख गाठींचे उत्पादन हाेणार असल्याची शक्यता व्यक्त केली. देशभरातील जिनिंग - प्रेसिंग मालकांच्या संघटनांनी यावर्षी रुईचे ३१० लाख गाठींचे उत्पादन हाेणार असल्याचे स्पष्ट केले. या आकडेवारीत किमान १२ व कमाल ६० लाख गाठींची तफावत दिसून येते.
अंदाजामुळे फसगत

शासनाने रुईच्या गाठींच्या उत्पादनाची निश्चित आकडेवारी वेळाेवेळी जाहीर केली तर कापड उद्याेगासाठी साेयीचे हाेईल. रुईच्या गाठींचे उत्पादन कमी असल्याचे निदर्शनास येताच कापड उद्याेग रुईच्या गाठी खरेदी करण्यासाठी स्पर्धा करतील आणि त्यातून गाठीचे व कापसाचे दर वधारण्यास मदत हाेईल. गाठींचे उत्पादन वाढत असल्याचे दिसून आले तर रुई व कापसाचे भाव काेसळण्याची शक्यता निर्माण हाेऊन यातून मार्ग काढण्यासाठी रुईच्या गाठींच्या निर्यातीचा मार्ग माेकळा हाेऊ शकताे. याप् रकारामुळे कापड उद्याेगात खळबळ निर्माण हाेऊ शकते. ती टाळण्यासाठी केवळ अंदाज व्यक्त केला जात असून, त्यामुळे कापूस व रुई उत्पादकांची फसगत हाेत असल्याचेही कापड उद्याेजक व जिनिंग - प्रेसिंग मालकांनी सांगितले.

Web Title: Why give ‘data’ of cotton production?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस