प्रशासनाला ग्रामसभेचे वावडे कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:11 AM2021-08-26T04:11:44+5:302021-08-26T04:11:44+5:30
संदीप तलमले पिपळा (डाकबंगला) : सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला) हे गाव ब्रिटिशकालीन डाक बंगला यामुळे प्रचलित आहे. येथील लोकसंख्या ...
संदीप तलमले
पिपळा (डाकबंगला) : सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला) हे गाव ब्रिटिशकालीन डाक बंगला यामुळे प्रचलित आहे. येथील लोकसंख्या जवळपास साडेपाच हजाराच्यावर असून, ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ आहे. मात्र गत चार वर्षांत एकही ग्रामसभा झाली नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटतील कशा, असा प्रश्न पिपळावासीयांकडून केला जात आहे.
ऑक्टोबर २०१७ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कल्पना तलमले यांनी सरपंचपदाचा पदभार सांभाळला. त्यापूर्वी १५ ऑगस्ट २०१७ मध्ये तत्कालीन सरपंच संगीता सावरकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सभेला नागरिकांचा प्रतिसादही होता व गावकऱ्यांचे प्रश्नसुद्धा मार्गी लागले. पण यावेळी १५ ऑगस्ट २०२१ ला ग्रामसभेला चार वर्षे पूर्ण होऊन पाचवे वर्ष सुरू झालेले आहे. गावकऱ्यांनी समस्या सांगायच्या कशा, असा प्रश्न समस्त पिपळावासीयांना पडला आहे.
शासनाने ठरविल्याप्रमाणे दरवर्षी २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर या तारखेला दरवर्षी ग्रामसभा होणे आवश्यक असते. त्यासाठी दवंडीही द्यावी लागते. लॉकडाऊन काळात ग्रामसभांना सरकारने बंदी घातली होती. मात्र या गावात लॉकडाऊनपूर्वीही ग्रामसभांचे आयोजन झालेले नाही.
वॉर्ड क्रमांक दोन येथील सदस्य मुक्ता कोकड्डे जिल्हा परिषद सदस्य निवडून गेल्याने मागील दीड वर्षांपासून त्यांचे पद रिक्त आहे. वॉर्ड क्रमांक तीन येथील ग्राम सदस्य गणपत सातपुते यांचा एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे पद रिक्त आहे. शासकीय योजना व विकास कामांची माहिती जनतेला मिळावी, हा ग्रामसभेचा प्रमुख उद्देश असतो. मात्र पिपळा येथील ग्रामपंचायत प्रशासन याची दखल कधी घेणार, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात सरपंच आणि ग्रामसचिवांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.