'आतापर्यंत तिकीट का काढले नाही?' असे म्हणत एसटी कंडक्टरची पाचवीतल्या विद्यार्थ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 10:39 PM2022-12-26T22:39:22+5:302022-12-26T22:40:05+5:30
Nagpur News महामंडळाच्या ‘लालपरी’ने अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्याकडून तिकीट काढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून हेकेखोर कंडक्टरने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (दि.२६) भिवापूर बसस्थानकावर घडला.
नागपूर : महामंडळाच्या ‘लालपरी’ने अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्याकडून तिकीट काढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून हेकेखोर कंडक्टरने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (दि.२६) भिवापूर बसस्थानकावर घडला. दरम्यान, संतापलेल्या पन्नासवर विद्यार्थ्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत कंडक्टर विरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
अंशुल विलास ठाकरे (९, रा. अड्याळ) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो स्थानिक बॉईज हायस्कूल शाळेत इयत्ता ५ व्या वर्गात शिकतो. तर मारहाण करणाऱ्या बस कंडक्टरचे नाव रूपेश कोरडे असे आहे. गावखेड्यातून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता भिवापूर तालुकास्थळावर अपडाऊन करतात. यासाठी महामंडळाची एसटी शिक्षणवाहिनी ठरते. सोमवारी अड्याळ, पुल्लर, सोमनाळा येथील अंदाजे ६० ते ७० विद्यार्थी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास एसटी बसने भिवापूरला येण्याकरिता निघाले. नेहमीप्रमाणे बसमध्ये गर्दी असल्याने विद्यार्थ्यांनी शक्य होईल त्या पद्धतीने तिकीट काढण्यास सुरुवात केली.
९ वर्षीय अंशुल हा गर्दीत कोंडला गेल्याने त्याला तिकीट काढणे शक्य झाले नाही. दरम्यान, भिवापूरचे बसस्थानक येताच, बसमधून विद्यार्थी हळूहळू उतरायला लागले. त्यामुळे गर्दी कमी होताच, चिमुकल्या अंशुलने तिकिटाचे पैसे कंडक्टरच्या हाती दिले. दरम्यान, संतापलेल्या कंडक्टरने आतापर्यंत तिकीट का काढले नाही? असे विचारत, अंशुलच्या कानशिलात दोन चार थापड मारल्या. त्यामुळे चिमुकल्या अंशुलच्या डोळ्याला लगेच सुजही आली. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत आपल्या शिक्षक व पालकांना सांगत, थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी लागलीच अंशुलला ग्रामीण रुग्णालयात नेत, प्राथमिक उपचार करवून घेतले. शालेय विद्यार्थी प्रतीक रामराज ठाकरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर कंडक्टर विरुद्ध कलम ३२३ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला.
या घटनेबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांत संताप व्यक्त होत असून, याबाबत माजी आ. सुधीर पारवे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यात शालेय विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या कंडक्टरला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
- हिमांशू अग्रवाल, अध्यक्ष, भाजपा, युवामोर्चा भिवापूर