बोर्डाच्या परीक्षेत का होत आहे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:26 PM2018-06-01T23:26:33+5:302018-06-01T23:27:31+5:30
गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांना ९०-९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळण्यामागे कारण काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांना ९०-९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळण्यामागे कारण काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत विचार केल्यास २००३ च्या आधीपर्यंत बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३ ते ९५ टक्केच्या आसपास मर्यादित राहत होती. त्यातही ९० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असायची. यानंतर मात्र गुणांमध्ये आश्चर्यकारक वाढ दिसून येत आहे. मुख्यत्वे २००४ नंतरपासून ही वाढ दिसून येत आहे. आधी सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली व त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या तज्ज्ञांच्या मतानुसार विद्यार्थ्यांच्या मनात असलेली परीक्षेबद्दलची भीती काढण्यासाठी बोर्डाने अनेक प्रकारचे बदल केले. मूल्यांकन प्रणालीतही हे बदल करण्यात आले. या बदलांतर्गत २००६ मध्ये सतत मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात मोठी वाढ झाली.
सुधारणांतर्गत सीबीएसईने २००६ मध्ये एक नवीन धोरण स्वीकारले होते. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा द्यायची नाही त्यांच्यासाठी शाळाअंतर्गत परीक्षा देण्याचा पर्याय खुला करण्यात आला. शाळाअंतर्गत परीक्षेच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली. ही स्थिती पाहून राज्य शिक्षण मंडळातर्फे राज्यातील कुठल्याही शाळेतून अंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वीमध्ये प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. हा निर्णय मागे घ्यावा म्हणून सीबीएसईचे तत्कालीन संचालक विनीत जोशी यांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली. मात्र विभागाने निर्णय बदलण्यास नकार दिल्याने जोशी यांना मागे हटावे लागले. यामुळे शाळाअंतर्गत परीक्षेचा फॉर्म्युला महाराष्ट्रात बंद झाला.
इंटर्नल मार्क्सची प्रक्रिया स्वीकारली
सीबीएसईने दहावी, बारावीच्या परीक्षेत इंटर्नल मार्क्सचे धोरण लागू केले. यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्र्यानेही इंटर्नल मार्क्स देण्याची पद्धत राज्यात लागू केली. तत्कालिन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी बोर्ड परीक्षेत मौखिक परीक्षेचे तंत्र लागू केले. सीबीएसईच्या इंटर्नल मार्क्सच्या धोरणामुळे राज्य बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी स्पर्धेत मागे पडत असल्याचा त्यांचा तर्क होता.