नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांचे ओझे शहरावर का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:17 PM2020-07-15T21:17:33+5:302020-07-15T21:19:49+5:30

मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले.

Why the increased patient burden on Nagpur city? | नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांचे ओझे शहरावर का?

नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांचे ओझे शहरावर का?

Next
ठळक मुद्देकोविड-१९ पॉझिटिव्हच्या आकड्यांमध्ये अडकले शहरवासी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि वस्त्यांबाबत शहरवासीयांना विशेष उत्सुकता आहे. त्यांच्या परिसरात तर कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ना याची माहिती त्यांना जाणून घ्यायची असते. मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले. जिल्हा प्रशासनाने विविध प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांच्या आधारावर ही माहिती जारी केली. परंतु परिसराचा उल्लेख केला नव्हता. केवळ नागपूर जिल्हा असे लिहिले होते. दुसरीकडे मनपातर्फे दररोज फेसबुक,ट्विटर, वेबसाईटच्या माध्यमातून आकडेवारी जारी केली जाते. त्यांनी सायंकाळी ५ वाजता शहरात केवळ ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगितले होते. जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या आकडेवारीत शहरवासीय अडकून पडले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होते की, नागरिक सुधारले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. या वक्तव्यानंतर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर खूप फिरू लागले. या मॅसेजमध्ये कधी १४ जुलैपासून तर कधी १६ जुलैपासून लॉकडाऊन लागणार असल्याचा उल्लेख करण्यात येत होता. परंतु या फेक मॅसेजबाबत ना जिल्हा प्रशासन ना मनपा प्रशासनाने काही वक्तव्य जारी केले. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर शहरात लॉकडाऊन लावण्याचा इशारा देणे कुठपर्यंत योग्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत असे कुठल्याही प्रकारचे संकेत जिल्हा प्रशासनाने जारी केलेले नाहीत. शहरवासी चिंतेत आहे. दुविधेत अडकले आहेत. सर्वप्रथम नागपूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचे खरे आकडे आणि परिसराची माहिती देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगळवारी जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची घोषणा केली. यात एम्सच्या प्रयोगशाळेत ६८, नीरीच्या प्रयोगशाळेत १८, माफसूच्या प्रयोगशाळेत १६, मेयोच्या १३, मेडिकलच्या ७, खासगी प्रयोगशाळेत ९, अ‍ॅण्टीजन टेस्टमध्ये ६ आणि इतर प्रयोगशाळेत ११ नमुने पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देण्यात आली. परंतु हे रुग्ण नेमके कोणत्या परिसरातील किंवा तालुक्यातील आहेत, याचा उल्लेख केला नाही.
दुसरीकडे मनपाने जारी केलेल्या माहितीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे सांगितले. रात्री ९ वाजेपर्यंत हा आकडा ६० पर्यंत पोहोचला. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या आकडेवारीतील सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतर पाहिले तर एकूण १०२ रुग्ण ग्रामीण भागातील होतात. परंतु जिल्ह्यात कामठी (२६ रुग्ण) वगळले तर उर्वरित रुग्णांचे नमुने कोणत्या तालुक्यातील आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. मंगळवारी २०११ नमुने तपासण्यात आले. दुसरीकडे मे-जून महिन्यात ३०० ते ४०० रुग्णांची तपासणी केली जात होती.

अखेर मनपा आयुक्त मुंढे गप्प का?
नागपूर शहरातील कोविड-१९ च्या संसर्गित रुग्णांसोबतच जिल्ह्यातील रुग्णांचे आकडे जोडून दाखविल्यामुळे रुग्णांची संख्या मोठी दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संसर्ग झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात वाढत्या रुग्णांमुळे जर शहरात लॉकडाऊन लावले जात असेल तर शहरवासीयांवर हा अन्याय होईल. संबंधित प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे काही बोलत नसल्याने नागरिक चिंतेत पडले आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊनदरम्यान व्हिडिओद्वारे नागरिकांना सतर्क व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते, त्याच धर्तीवर मुंढे यांनी समोर येऊन नागरिकांना हेही सांगितले पाहिजे की, नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.

शहरावर का लादले जात आहेत रुग्ण
मागील काही दिवसापासून कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु प्रशासनाकडून कुठल्या भागात रुग्ण वाढताहेत ते सांगितले जात नाही. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संसर्ग वाढत आहे. परंतु त्यांनाही आता नागपूर शहरातील रुग्णांसोबत जोडून दाखविले जात आहे. अखेर प्रशासनाला हे दोन्ही आकडे आजच जोडून का दाखवावे लागत आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. शहरवासीयांनी लॉकडाऊन पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागावे असे कुणालाही वाटत नाही. परंतु जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना शहरातील रुग्णांशी जोडून दाखविले जात असल्याने शहरात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Why the increased patient burden on Nagpur city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.