मंत्र्यांकडून प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:13 PM2020-09-11T22:13:07+5:302020-09-11T22:14:18+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे सोमवारी पूर्व विदर्भातील तीन विद्यापीठांची आढावा बैठक घेणार आहेत.

Why the insistence of direct meeting by the ministers? | मंत्र्यांकडून प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास का ?

मंत्र्यांकडून प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास का ?

Next


लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून यासंदर्भात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे सोमवारी पूर्व विदर्भातील तीन विद्यापीठांची आढावा बैठक घेणार आहेत. अगोदरच नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. अशा स्थितीत मंत्रिमहोदयांना ऑनलाईन बैठक घेणे शक्य आहे. मात्र ते प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास करुन विद्यापीठाला संकटात का टाकत आहेत, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळातच उपस्थित होत आहे.
उदय सामंत सोमवारी सकाळी ११ वाजता नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय भवनात नागपूर विद्यापीठ तसेच कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांच्याकडेच गोंडवाना विद्यापीठाचादेखील प्रभार आहे. परीक्षांचा आढावा असल्याने तेथे संबंधित अधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित राहतील. याशिवाय विद्यापीठाचे इतर संवैधानिक पद असलेले अधिकारीदेखील उपस्थित राहतील.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला व त्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे कळले होते. याशिवाय विविध कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी ताप तसेच इतर आजारांनी ग्रस्त आहेत. उगाच कोरोनाचा धोका नको म्हणून अनेक जण कार्यालयात येण्याचा धोका पत्करत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत परीक्षांच्या आयोजनाचे मोठे आव्हान आहे. प्रशासनातील इतर अधिकारीदेखील या कार्यात मदत करत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित राहत तयारी करायची आहे. अशा स्थितीत मंत्रिमहोदयांनी प्रत्यक्ष बैठक घेणे योग्य होणार नाही, असे मत एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

ऑनलाईनचा पर्याय का नाही
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: ऑनलाईन माध्यमातून आढावा घेण्यावर भर देत आहेत. विविध विद्यापीठांच्या प्राधिकरण बैठकादेखील ऑनलाईन होत आहे. अशा स्थितीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून ऑनलाईनचा पर्याय का वापरण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ. सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर आम्हाला अद्याप अधिकृत पत्र किंवा मेल आलेला नसल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त इतर काही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र शासकीय पातळीवरुन मंत्र्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आला आहे.

Web Title: Why the insistence of direct meeting by the ministers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.