महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 09:39 PM2023-01-25T21:39:44+5:302023-01-25T21:40:25+5:30
Nagpur News बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.
नागपूर : प्रत्येक धर्मातील त्यांच्या सर्वोच्च प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन हे त्या-त्या धर्माच्या लोकांच्याच हातात असते. असायलाच हवे. मग बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.
संघयान संकल्प परिषद आयोजन समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर २६ जानेवारीपासून तीनदिवसीय संघयान संकल्प परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. भदंत आनंद महास्थवीर यांनी सांगितले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा ऐन भरात आला असता, आंदोलनातीलच काही लोकांनी हे आंदोलन कमजोर केले. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा गतिशील करायचे आहे. परंतु, यात सर्वसामान्य बौद्ध समाजबांधव सहभागी होत नाहीत, तोपर्यंत याला गती येणार नाही. यासोबतच भिक्खू संघालाही संघटित होण्याची गरज आहे, यासाठीच ही संघयान संकल्प परिषद बोलावण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे, देशात एकच भिक्खू संघ असावा, तसेच १९५६ च्या धम्मक्रांतीच्या महत्त्वावर चर्चा केली जाईल. यात अनेक ठरावसुद्धा मंजूर केले जातील. यात देशभरातील भिक्खू आणि विचारवंत सहभागी होतील. यावेळी मुख्य आयोजक भदंत हर्षबोधी महास्थवीर आणि मुख्य संयोजक भय्याजी खैरकर उपस्थित होते.