पुस्तक वाहतुकीच्या खर्चाचा बोजा मुख्याध्यापकांवर का ?
By गणेश हुड | Published: June 8, 2024 05:16 PM2024-06-08T17:16:07+5:302024-06-08T17:16:32+5:30
Nagpur : शाळांऐवजी समुहसाधन केंद्रापर्यंतच पोहचवली जाताहेत पुस्तके
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावी, यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शाळेपर्यंत पुस्तके पोहचवण्याची जबाबदार निश्चित केली आहे. मात्र वाहतुकदाराकडून शाळेपर्यंत पुस्तके न पोहचवता केंद्रांतर्गत सर्व शाळांची पुस्तकं समुह साधन केंद्रापर्यंतच पोहचविल्या जात आहे. त्यामुळे केंद्र ते शाळा या दरम्यानचा पुस्तकांच्या वाहतुकीचा आर्थिक बोजा मुख्याध्यापकांना सोसावा लागत आहे.
प्रत्येक शाळेत पुस्तके पोहचवून देण्याचे आदेश असून यासाठीचा वाहतुक खर्च वाहतुकदारास दिला जात आहे. असे असतानाही समुह साधन केंद्रापर्यंतच पुस्तके पोहचवली जात आहे. त्यामुळे समुह साधन केंद्रापासून शाळेपर्यंतचा वाहतुक खर्च मुख्याध्यापकांना करावा लागत आहे. वाहतुकदारास लाभ पोहचविण्यामागे कुणाची भूमिका आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विभागीय बालभारती पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर व तालुकास्तराहून शाळास्तरापर्यंत पुस्तके पोहचविण्याबाबतची प्रक्रीया व जबाबदारी याबाबतच्या सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना असलेले परिपत्रक २ मे रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याकडून निर्गमित केले आहे . त्यानुसार तालुकास्तरावरून शाळास्तरावर पुस्तके पोहचवण्यासाठीच्या खर्चाचे निकष ठरवले आहे. मात्र शिक्षण परिषदेने निर्गमित केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन होत आहे. तालुका स्तरावरुन पुस्तके समुह साधन केंद्रापर्यंतच पोहचविल्या जात आहेत. येथून शाळेत पुस्तकं घेवून जाण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना दिल्या जात असल्याची माहिती आहे. एकूणच केवळ वाहतूकदारांच्या वाहतूक खर्चाची बचत व्हावी याकरीता अधिकांनी वाहतूकदाराला शाळांऐवजी समुह साधन केंद्रापर्यंतच पाठ्यपुस्तके पोहचवण्याची मुभा दिल्याचा मुख्याध्यापकांचा आरोप आहे.