निकालानंतर का होतो स्टॅम्पपेपरचा काळाबाजार? १०० रुपयांचा स्टॅम्प १३० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 07:28 PM2022-07-04T19:28:00+5:302022-07-04T20:11:56+5:30

Nagpur News दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावीचे निकाल लागताच स्टॅम्प व्हेंडर्सनी स्टॅम्पपेपरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू केला आहे. व्हेंडर्स १०० रुपयांचे स्टॅम्प १२० ते १३० रुपये तर ५०० रुपयांचे ६०० रुपयांमध्ये विकत आहेत.

Why is there a black market for stamp paper after the result? Rs 100 stamp at Rs 130 | निकालानंतर का होतो स्टॅम्पपेपरचा काळाबाजार? १०० रुपयांचा स्टॅम्प १३० रुपयांत

निकालानंतर का होतो स्टॅम्पपेपरचा काळाबाजार? १०० रुपयांचा स्टॅम्प १३० रुपयांत

googlenewsNext
ठळक मुद्देगरजेपोटी नागरिकांची खरेदीनियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावीचे निकाल लागताच स्टॅम्प व्हेंडर्सनी स्टॅम्पपेपरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू केला आहे. लोकांची गरज पाहता व्हेंडर्स १०० रुपयांचे स्टॅम्प १२० ते १३० रुपये तर ५०० रुपयांचे ६०० रुपयांमध्ये विकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे १४ कोटी रुपयांचे स्टॅम्पपेपर कोषागारात उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यानंतरही होणारा काळाबाजार गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे नागरिकांचे मत आहे.

सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, रघुजीनगर, रेशीमबाग आणि महाल येथील रजिस्ट्री कार्यालयात हा धंदा खुलेआम सुरू आहे. स्टॅम्प व्हेंडर्सवर होणारी कारवाई थातूरमातूर असल्यामुळे त्यांचीही हिंमत वाढली आहे. तातडीचे काम आणि झंझट नको म्हणून नागरिकही जास्त किमतीत स्टॅम्प खरेदी करताना दिसत आहेत. स्टॅम्प व्हेंडर्सवर कारवाईचे अधिकार आहेत. पण या विभागाचे अधिकारी तक्रारींची क्वचितच दखल घेतात. दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि अन्य विविध कामांसाठी स्टॅम्पपेपरची गरज भासते. विद्यार्थ्यांच्या निकालानंतर स्टॅम्पपेपरचा काळाबाजार का होतो, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय अनधिकृत व्हेंडर्सनेही स्टॅम्पविक्रीचा धंदा सुरू केल्याचे काही नागरिकांनी लोकमतला सांगितले.

विविध कामांसाठी आवश्यक

सरकारच्या नियमांनुसार विविध कामांसाठी स्टॅम्पपेपरची गरज भासते. शपथपत्र, भाडेपत्र, जमीन खरेदी-विक्री, जातीचे प्रमाणपत्र, जन्माचे प्रमाणपत्र, नळ व विजेच्या कनेक्शनसह बहुतांश कामांसाठी स्टॅम्पपेपरची आवश्यकता असते. नागपूर शहरात अधिकृत ५५ स्टॅम्प व्हेंडर्स आहेत. दररोज ३ हजारांपेक्षा जास्त स्टॅम्पची विक्री होते. व्हेंडरने चालान भरल्यानंतर त्यांना हवे तेवढे स्टॅम्प कोषागार कार्यालयातून देण्यात येतात. कोरोना काळाप्रमाणे सध्या स्टॅम्पचा तुटवडा नाहीच. स्टॅम्प व्हेंडर्सला सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. त्यानंतरही होणारा काळाबाजार अचंबित करणारी असल्याचे अधिकारी म्हणाले.

व्हेंडरला १०० रुपयांवर मिळतात केवळ २ रुपये!

अनेक वर्षांपासून स्टॅम्प व्हेंडर्सला १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर केवळ २ रुपये कमिशन मिळते. १०० रुपयांच्या स्टॅम्पमध्ये कमिशनचा समावेश असतो. वाढत्या महागाईसोबतच कमिशन वाढविण्याची व्हेंडर्सची मागणी आहे. कमिशन कमी असल्यामुळे ग्राहकांकडून ५ वा १० रुपये घेतले तर चुकीचे नाही, असे मत एका व्हेंडरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पण सरकारच्या नियमानुसार जास्त किमतीत स्टॅम्पपेपर विकणे गुन्हा ठरतो.

निकाल लागल्यानंतर का होतो काळाबाजार

दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर नागरिकांची गरज पाहून व्हेंडर स्टॅम्पपेपरचा काळाबाजार करतात. नागरिकही गरजेपोटी जास्त दरात खरेदी करतात. व्हेंडर्सवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसल्यामुळे त्यांचे फावत आहे. दिवसेंदिवस काळाबाजाराचा हा व्यवसाय वाढतच आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्याची मागणी काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Why is there a black market for stamp paper after the result? Rs 100 stamp at Rs 130

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार