नागपुरातच बस्तान कशासाठी?
By admin | Published: June 19, 2015 02:36 AM2015-06-19T02:36:41+5:302015-06-19T02:36:41+5:30
कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले.
निलंबित कांबळेंचे कारागृह परिसरातच ‘वैभव’!
नागपूर : कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले. ऐषोआरामाच्या साऱ्याच सुविधा मिळत असल्याने गुन्हेगारांसाठी कारागृहाच्या आत-बाहेरचा फरकच उरला नाही. परिणामी नागपुरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली.
दुसरीकडे कारागृहातील गुन्हेगार कमालीचे निर्ढावले. त्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ‘जेल ब्रेक’ घडवून आणले. ३१ मार्चच्या पहाटे पाच खतरनाक गुन्हेगार कारागृहातून पळून गेले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सर्वप्रथम कारागृह अधीक्षक वैभव कांबळेंना निलंबित केले. त्यानंतर पाच कर्मचारी आणि चार अधिकारी आणखी निलंबित झाले. एका कर्मचाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले. सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली.
या समितीने सरकारला काय अहवाल दिला ते कळायला मार्ग नाही. मात्र, निलंबित कांबळेची उर्मटगिरी अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एका उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. कांबळे यांना सरकारने निलंबित करून आज ७९ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, कांबळेचे बस्तान हलले नाही. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चौकशीत काही गंभीर गैरप्रकार अधोरेखित झाल्यामुळे कांबळेचे मुख्यालय स्थानांतरित करण्याची तयारी झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, कारागृह प्रशासन आणि गृह खात्यातील वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार कांबळेंना कोल्हापूर मुख्यालय देण्यात आले.
या निर्णयाच्या आदेशाला आता १० ते १५ दिवस झाले आहे. मात्र, कांबळेंनी हा आदेश मानण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांनी कोल्हापूरला जाण्याऐवजी आपले बस्तान नागपुरातच ठेवले आहे. (प्रतिनिधी)