नागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:25 PM2018-06-05T23:25:29+5:302018-06-05T23:25:40+5:30
बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२६ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले. याशिवाय अगोदर विद्यापीठाने निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या ९८ तर ‘एलईसी’ची प्रक्रिया न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांमधील प्रवेश गोठविले होते. आता एकूण २५३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाला महाविद्यालयांमधून विरोध सुरू झाला आहे. नागपूर विद्यापीठात आजच्या स्थितीत ३५२ पैकी १५६ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. अशास्थितीत अनेक विभागांत तर नियमित शिक्षकांचीदेखील वानवा आहे. महाविद्यालयांना लावलेल्या नियमांनुसार त्या विभागांमध्येदेखील विद्यापीठाने प्रवेशबंदी लागू करायला हवी, असा सूर प्राचार्यांमध्ये आहे. जर विद्यापीठाने विभागांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याची अधिसूचना काढली आहे, तर मग महाविद्यालयांनादेखील ही परवानगी द्यायला हवी, अशी मागणीदेखील समोर येत आहे.
विद्यापीठाच्या पोटात का दुखते?
प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यापीठाचे हे पाऊल विद्यार्थीहिताचे नसल्याची टीका केली आहे. मुळात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम आणि नियमित शिक्षक यांची सांगड घालणे अतिशय कठीण बाब आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम नागपुरात आले आहेत. या अभ्यासक्रमांना अनुदानित तुकड्यांमधील पात्र शिक्षक शिकवत आहेत. असे असताना विद्यापीठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ एका व्यक्तीसोबत असलेल्या वैमनस्यामुळे शेकडो महाविद्यालये व हजारो विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठ प्रशासन खेळखंडोबा करत असल्याचा त्यांनी आरोप लावला.
विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही
महाविद्यालये गप्प का?
यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता, नियमांनुसारच महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अनुदानित महाविद्यालयांवर ही कारवाई झालेली नाही. विनाअनुदानित महाविद्यालये व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांवर नियमांनुसारच कारवाई झाली आहे. जर त्यांनी शिक्षकांची भरती केली तर त्यांच्यावरील बंदी उठविण्याला आमची काहीच हरकत नसेल. जर विद्यापीठाने चुकीचे पाऊल उचलले आहे, तर मग एकाही महाविद्यालयाकडून आक्षेपाचे पत्रदेखील का आले नाही, असा प्रश्न डॉ. काणे यांनी उपस्थित केला.
विद्यापीठाच्या विभागांमधील रिक्त पदांची स्थिती
संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
प्राध्यापक ५३ २५ २८
सहयोगी प्राध्यापक ८९ ४७ ४२
सहायक प्राध्यापक १९२ ११९ ७३
शिक्षक समकक्ष १८ १० ०८
एकूण ३५२ १९६ १५६