"नवाब मलिकांना जो न्याय तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही?"; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:55 PM2023-12-11T15:55:37+5:302023-12-11T16:05:44+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आणि दुसरा दिवस राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांच्या उपस्थितीने गाजला. मलिक यांनी सत्ताधारी बाकावर बसून सभागृहात सहभाग घेतल्यानंतर विरोधकांनी भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. त्यानंतर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येते आणि जाते सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असे म्हणत मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला. त्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पत्रही लिहिलं होतं. आता, याच पत्राचा धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सवाल केला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली. भाजपानेच नवाब मलिक देशद्रोहाचे आरोप केले होते. त्याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. देश महत्त्वाचा आहेच, मग नवाब मलिक यांना एक न्याय आणि प्रफुल्ल पटेल यांना दुसरा न्याय का?, प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही पत्र लिहा, टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
सध्या पत्रांचा जमाना आहे, निवडणुक आयोगाला पत्र दिलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. या पत्राचं आम्ही स्वागत करतो. जो न्याय नवाब मलिकांना तोच प्रफुल्ल पटेल यांना लागणार का? असा सवाल उद्ध ठाकरेंनी भाजपला केला. मोदी यांनी स्वतः बीकेसीमधील सभेत कुछ लोक मिरची का व्यापार करते है, असे म्हटले होते. आता, त्यांच्यावर कारवाई करणार का? असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतीत सरकार नरमाईची भूमिका का घेतंय, त्यांच्यावर ईडीकडून चौकशी का होत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
नवाब मालिकांना एक न्याय लावणार असाल, तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 11, 2023
शेतकऱ्यांना मदत करावी - ठाकरे
शेतकऱ्यांवर वारंवार एकामागोमाग एक संकटं येत आहेत. विमा कंपन्यांनी आपली दारं खिडक्या बंद केली आहेत, कर्ज वसुलीसाठी बँका मागे लागल्या आहेत. येथील काही शेतकरी मुंबईत अवयव विकायला आले होते, त्यावेळी ते मातोश्रीवर आल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.