लहानग्यांच्या जीवाशी का खेळता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:09+5:302021-05-07T04:08:09+5:30
नागपूर : देशपातळीवरील प्रमुख परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या. विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या ...
नागपूर : देशपातळीवरील प्रमुख परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या. विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मग पाचवी आणि आठव्या वर्गासाठी शिष्यवृत्तीच्या ऑफलाईन परीक्षा घेऊन परीक्षा परिषद काय साध्य करणार आहे. परीक्षेच्या नावावर लहानग्यांच्या जीवाशी का खेळले जात आहे, असा सवाल शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ मे रोजी होणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शासनाला तीन पत्रे देऊन विनंती केली. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट गुरुवारी परीक्षा परिषदेने ५ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी पर्यवेक्षण व अन्य बाबींचे नियोजन करण्याविषयीचे पत्र पाठवून संभ्रम वाढवला आहे. राज्यभरात एकूण सहा लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर २०० ते ५०० परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षा कोरोनाच्या काळात घेणे, खरंच आवश्यक आहे का? असा सवाल संघटनेने केला आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे यांनी केली आहे.
- परीक्षा पुढे न ढकलल्यास किंवा मे महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अट्टाहास कायम ठेवल्यास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, पालक यांच्या आरोग्यासाठी शिक्षक परिषद परीक्षेवर बहिष्कार घालणार.
योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट राज्य शिक्षक परिषद