आमच्या भविष्यासोबतच खेळ का?विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:48 PM2020-09-30T21:48:53+5:302020-09-30T21:50:26+5:30
कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकारणातून तर हा प्रकार होत नाही ना, असा सवालदेखील व्यक्त करण्यात येत असून काही प्राधिकरण सदस्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने मोबाईलवरून परीक्षा देण्यासाठी विशेष अॅपदेखील विकसित केले होते. या अॅपमुळेदेखील विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम जाणवत होता. मात्र तो दूर होत असतानाच विद्यार्थ्यांना मंगळवारी मोठा धक्का बसला. यासंदर्भात अनेकांना बुधवारी माहिती कळाली व बहुतांश जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरदेखील विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
सरकार विद्यार्थी हिताचा विचार कधी करणार?
विद्यापीठातील काही प्राधिकरण सदस्यांनीदेखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. राज्य शासनाच्या अपरिपक्व धोरणाचा परत एकदा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. सरकार विद्यार्थी हिताचा विचार कधी करणार, असा प्रश्न व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांच्या नजरा मुंबईकडे
काही आजी-माजी प्राधिकरण सदस्यांनी विद्यापीठाची परीक्षेची तयारी पूर्ण नव्हती व म्हणून परीक्षा पोस्टपोन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमची परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी असून प्रश्नसंचदेखील तयार आहेत. मोबाईल अॅपवरदेखील काहीच समस्या येणार नाहीत. आमच्या नजरा मुंबईकडेच लागल्या असून आंदोलन मिटल्यावर नवीन वेळापत्रक जारी करू, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.