खासगी लॅबला मुंबईत परवानगी नागपुरात का नाही? खा. डॉ. महात्मे यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:04 IST2020-04-23T00:01:43+5:302020-04-23T00:04:15+5:30
‘कोव्हीड-१९’च्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नसल्याने फार कमी नमुने तपासले जात आहे. मुंबईत खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेवर असे निर्बंध नाहीत, नागपूरलाच परवानगी देण्यात का उशीर होतोय, असा प्रश्न पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला आहे.

खासगी लॅबला मुंबईत परवानगी नागपुरात का नाही? खा. डॉ. महात्मे यांचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात खासगी प्रयोगशाळांमध्येही जास्तीत जास्त संख्येत नमुने तपासणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे यांना केवळ भरती रुग्णांचेच नमुने घेण्याची परवानगी आहे. बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांचे नमुने घेण्याची परवानगी नाही. यातही ‘कोव्हीड-१९’च्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नसल्याने फार कमी नमुने तपासले जात आहे. मुंबईत खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेवर असे निर्बंध नाहीत, नागपूरलाच परवानगी देण्यात का उशीर होतोय, असा प्रश्न पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व्हायला हवेत, असे मतही मांडले.‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव’ या विषयावर ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, नागपुरात बुधवारी सायंकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९८ वर पोहचली होती. ही संख्या वाढत जाणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना (लॅब) कोरोनाची जास्तीत जास्त चाचणी करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. मुंबईच्या तुलनेत नागपूरच्या मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेवर काही निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत केवळ ३० नमुने तपासण्यात आले. प्रशासनाने हे निर्बंध शिथिल केल्यास याचा फायदा संशयित रुग्णांना होऊ शकतो. विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये जाऊन नमुने देण्याची व तिथे दिवसभर थांबण्याची भीती वाटत असेल त्यांच्यासाठी या खासगी प्रयोगशाळा पर्याय ठरतील. या प्रयोगशाळा आयुष्यमान भारत योजनेशी जुळल्याने लाभार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल. नागपुरात ८० टक्के रुग्णसेवा खासगीमधून तर केवळ २० टक्के रुग्णसेवा शासकीय रुग्णालयातून दिली जाते. असे असतानाही कोरोनाबाधित रुग्णांवर केवळ मेयो, मेडिकलमध्येच उपचाराची सोय आहे. स्वाईन फ्लू किंवा सार्स आजारात खासगी रुग्णालयांनाही उपचार करण्याची परवानगी आहे. त्याच धर्तीवर कोरोनाबाधितांवर उपचाराची सोय व्हायला हवी. विशेष म्हणजे, काही खासगी इस्पितळांमध्ये ‘एअर लॉक’ व ‘एअर निगेटिव्ह आयसोलेशन सिस्टीम’ आहे. रुग्णाच्या खोलीतील हवाही बाहेर पडताना निर्जंतुकीकरण होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास खासगी हॉस्पिटलची मोठी मदत होऊ शकते. या रुग्णालयांनाही आयुष्यमान भारत योजनेशी जोडणे गरजेचे आहे.
क्वारंटाइनचे कठोरतेने पालन आवश्यकच
लोणारा येथील क्वारंटाइन असलेले संशयित इमारतीच्या छतावर एकत्र असल्याचे छायाचित्र ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. हे धक्कादायक आहे. असे जर क्वारंटाइनचे नियम धुडकावले जात असतील तर हेच अलगीकरण कक्ष प्रादुर्भावाचे केंद्र ठरेल. संशयितांना क्वारंटाइन यासाठी केले जाते कारण ते ‘हायरिस्क’ ग्रुपमधील आहेत. यामुळे क्वारंटाइन नियमांचे कठोरतेने पालन होणे आवश्यकच आहे.
बोलूनही उपाययोजन नाहीत
खासगी प्रयोगशाळेत तपासणीवरील निर्बंध दूर करून मुंबई प्रमाणेच नागपुरातही ती सोय उपलब्ध करून देण्यासाठी व खासगी हॉस्पिटलध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले. परंतु अद्यापही उपाययोजना केल्या नसल्याची खंतही खा. डॉ. महात्मे यांनी बोलून दाखविली.