घरापुढे टिन ठोकण्याचे उपद्व्याप कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:05 PM2020-08-24T22:05:27+5:302020-08-24T22:06:34+5:30
कोविड-१९ चा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच सुरुवातीला वस्त्यात टिन लावून सील केल्या जात होत्या. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता परिसर सील केला जात नाही. परंतु पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घराला टिन लावण्याचा उपद्व्याप अद्याप सुरूच आहे. यावर लाखो रुपयांचा झालेला खर्च पाण्यात जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ चा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच सुरुवातीला वस्त्यात टिन लावून सील केल्या जात होत्या. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता परिसर सील केला जात नाही. परंतु पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घराला टिन लावण्याचा उपद्व्याप अद्याप सुरूच आहे. यावर लाखो रुपयांचा झालेला खर्च पाण्यात जात आहे.
कोविड-१९ नियंत्रण व उपाययोजनांसंदर्भात महापालिका आयुक्तांनी झोनच्या सहायक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच संबंधित व्यक्तीच्या घरापुढे वा अपार्टमेंट परिसरात टिन लावण्यासाठी झोनचे अधिकारी व कंत्राटदार तत्पर असतात. टिन लावून संबंधित घराचा रस्ता बंद केला जात नाही. मग टिन कशासाठी लावल्या जातात, हा चौकशीचाच भाग आहे. टिन लावण्याला पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबीयांचा विरोध असतो. परंतु प्रशासनाच्या निर्देशानुसार कारवाई करावी लागते, असे संबंधित अधिकारी व कंत्राटदाराकडून सांगितले जाते. यासंदर्भात झोनच्या सहायक आयुक्तांशी चर्चा केली असता, काहींनी आमच्या झोनमध्ये फक्त बॅनर लावले जात असल्याचे सांगितले. मात्र अजूनही घरापुढे टिन लावण्याचा प्रकार सुरू आहे.
३० लाखाहून अधिक खर्च
एका घराला टिन लावण्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च केले जातात. नागपूर शहरात मागील काही दिवसात दररोज ८०० ते १००० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याचा विचार करता टिन लावल्यावर दररोज लाखोचा खर्च होत आहे. यावर ३० लाखाहून अधिक खर्च झाल्याची माहिती आहे.
काही झोनमध्ये फलक व स्टिकरचा वापर
टिन लावण्याला नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता, काही झोनच्या सहायक आयुक्तांनी पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरापुढे टिन न लावता बॅनर व पोस्टर लावण्याला सुरुवात केली आहे. मनपाच्या सर्व झोनमध्ये अशाप्रकारे बॅनर व पोस्टरचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.