रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्यांना ‘सर्व्हिस चार्ज’ कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:26 PM2019-09-02T12:26:17+5:302019-09-02T12:27:28+5:30
इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने जारी (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंत्रालयाने रविवारपासून ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा सर्व्हिस चार्ज लावणे सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या झेडआरयुसीसी सदस्यांनी ही प्रवाशांची लूट असल्याचे सांगून त्यास विरोध दर्शविला आहे. आधी सेवा द्या मग शुल्क आकारा, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेची १०० टक्के हमी दिल्यास प्रवाशी स्वत: सर्व्हिस चार्ज देतील, असे सदस्यांचे मत असून प्रवाशांची ही लूट थांबविण्याची मागणी केली आहे.
इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने जारी (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सेवा शुल्क आकारल्यानंतर जीएसटीही प्रवाशांकडून वसूल करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते ही प्रवाशांची लूट आहे. सेवा शुल्काच्या नावावर आयआरसीटीसी एका आरक्षणाच्या तिकीटावर एका प्रवाशाच्या जनरल तिकिटाचा खर्च वसूल करीत आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ३ वर्षांपुर्वी सेवाशुल्क बंद करण्यात आले होते. यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे स्लिपर क्लास ई तिकिटासाठी २० रुपये, एसी क्लाससाठी ४० रुपये सेवाशुल्क वसूल करण्यात येत होते. आता आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांकडून सेवा शुल्कास मंजुरी दिली आहे. सेवा शुल्क माफ करण्याची योजना काही दिवसांसाठीच होती,असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
प्रवाशांवरील बोझा वाढणार
‘ई तिकीट काढल्यामुळे प्रवाशांवर बोझा पडणार आहे. प्रवाशांना सवय लावण्यासाठी सेवा शुल्क आकारण्यात येत नव्हते. प्रवाशांना ई तिकिटाची सवय लागल्यानंतर सेवा शुल्क सुरु करण्यात आले आहे. याशिवाय जीएसटी वेगळा वसूल करण्यात येईल. रेल्वे सेवा देत नसून व्यापार करीत आहे. यामुळे प्रवाशांवरील बोझा वाढणार आहे.’
-प्रवीण डबली, माजी झेडआरयूसीसी सदस्य, दपूम रेल्वे
सेवा शुल्क आकारणे चुकीचे
‘रेल्वेकडून आरक्षण शुल्क, सुपरफास्ट रेल्वेचा चार्ज आकारण्यात येत असताना सर्व्हिस चार्ज आकारणे चुकीचे आहे. शासन रेल्वेचे खाजगीकरण करू पाहत आहे. कोचचे टपकणारे छत, घाण चादर, उशी, निकृष्ट भोजन मिळत असताना सर्व्हिस चार्ज आकारणे चुकीचे आहे. सर्व्हिस चार्ज घेतल्यानंतर कन्फर्म तिकिटाची हमी रेल्वे घेणार आहे काय, हा प्रश्न आहे.’
-बसंत कुमार शुक्ला, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे