शॉर्टकट अन् राँगसाईड कशासाठी? वेळेची बचत ठरु शकते जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:01 AM2021-06-28T11:01:46+5:302021-06-28T11:02:07+5:30

Nagpur News अनेक वाहनचालक रॉंगसाईडने वाहन चालवितात. वाहतूक पोलीस वेळोवेळी अशा वाहनचालकांवर कारवाई करतात. परंतु तरीसुद्धा रॉंगसाईड वाहने चालविण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

Why Shortcuts and wrong side? Saving time can be life threatening | शॉर्टकट अन् राँगसाईड कशासाठी? वेळेची बचत ठरु शकते जीवघेणी

शॉर्टकट अन् राँगसाईड कशासाठी? वेळेची बचत ठरु शकते जीवघेणी

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नागपूर शहरात अपघातांचे प्रमाण खूप मोठे आहे. आपला जीव धोक्यात घालून वाहनचालक वाहने चालवितात. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होते. वेळप्रसंगी त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्यामुळे त्यांच्यासह इतरांच्या जीविताला धोका निर्माण होतो. तर अपघात होणाऱ्या महत्वाच्या कारणात रॉंगसाईड वाहन चालविणे हे प्रमुख कारण आहे. वेळेची बचत व्हावी यासाठी अनेक वाहनचालक रॉंगसाईडने वाहन चालवितात. परिणामी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाशी त्यांची धडक होऊन गंभीर अपघात घडतो. वाहतूक पोलीस वेळोवेळी अशा वाहनचालकांवर कारवाई करतात. परंतु तरीसुद्धा रॉंगसाईड वाहने चालविण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

जाधव चौक गणेशपेठ

-शहरातील गणेशपेठ बसस्थानकाच्या बाजूला नेहमीच अतिक्रमण झालेले दिसते. फळ विक्रेते, ऑटोचालक आपली दुकाने रस्त्यावर लावतात. त्यामुळे रहदारीसाठी अतिशय कमी रस्ता उरतो. या मार्गावरून एसटीच्या बसेसची ये-जा सुरू असते. परंतु येथील अतिक्रमणाविरुद्ध थातूरमातूर कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जैसे थे परिस्थिती निर्माण होते.

अपघातास निमंत्रण

जाधव चौकात खासगी ट्रॅव्हल्सची कार्यालये आहेत. आधीच अतिक्रमण आणि त्यात खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या राहत असल्यामुळे वाहनचालकांना अतिशय कमी रस्ता उरतो. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे येथील अतिक्रमण काढण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस कधीकधी ड्युटीवर असतात. परंतु ते चालानच्या कारवाईत व्यस्त असल्यामुळे अनेक वाहनचालक रॉंगसाईड वाहने चालविताना दिसतात.

महाल गांधीगेट

महाल गांधीगेट हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. शहरातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे येथे नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. या भागातील रस्तेही अरुंद असल्यामुळे रहदारीसाठी फारच कमी रस्ता उरतो. त्यामुळे या परिसरात नेहमीच लहानमोठे अपघात होताना दिसतात.

अपघातास निमंत्रण

गांधीगेट महाल ते घाटे रेस्टॉरंट या भागात वाहनचालक जाऊ शकत नाहीत. परंतु तरीसुद्धा अनेक वाहनचालक रॉंगसाईड वाहने चालवून या रस्त्यावरून जातात. अनेक दुकानदार आपली वाहने रस्त्यावर उभी करीत असल्यामुळे अतिशय कमी रस्ता रहदारीसाठी उरतो. त्यामुळे येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. या भागात अनेकदा वाहतूक पोलीसही ड्युटीवर राहत नसल्यामुळे वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालविताना दिसतात.

नागपूर रेल्वेस्थानक

नागपूर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी लोहापूल चौकातून उड्डाणपूल आहे. परंतु शॉर्टकट म्हणून अनेक वाहनचालक उड्डाणपुलाच्या खालून रॉंगसाईड वाहने चालविताना दिसतात. या मार्गावर एमपी बसस्टॅड आणि गणेश टेकडी मंदिर आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच भाविकांची आणि प्रवाशांची गर्दी आढळते. अशा स्थितीत रॉंगसाईड वाहने चालविण्यात येत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होताना दिसते.

अपघातास निमंत्रण

लोहापूल चौकाकडून उड्डाणपुलाच्या खालून रॉंगसाईड वाहने चालविणे चुकीचे आहे. परंतु नियमाची पायमल्ली करून काही वाहनचालक रॉंगसाईड वाहन चालवितात. या भागात वाहतूक पोलीस ड्युटीवर असताना नियमांचे उल्लंघन होत नाही. परंतु वाहतूक पोलीस नसल्यास वाहनचालक सर्रास रॉंगसाईड वाहन चालविताना दिसतात.

वर्षभरात १५९ कोटीचा दंड वसूल

नागपूर शहरात १ मे २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत एकूण ९ लाख ४३ हजार ८९१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १५९ कोटी ८ लाख ७० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करूनही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

.........

Web Title: Why Shortcuts and wrong side? Saving time can be life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात