भारतीयांच्या संशोधनाला अभ्यास पुस्तिकेत स्थान का नाही? पद्मभूषण शशिकुमार चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 09:51 PM2019-03-06T21:51:59+5:302019-03-06T21:54:18+5:30

डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर आधारीत व पेपर सादरीकरणापुरते मर्यादित असते. त्यामुळे नव्या संशोधकांनी अभ्यास पुस्तिकेत स्थान मिळेल, असे स्वत:चे काहीतरी निर्माण करावे, असे आवाहन ख्यातिप्राप्त गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केले.

Why is there no place in the study book of Indian research? Padmabhushan Shashikumar Chitre | भारतीयांच्या संशोधनाला अभ्यास पुस्तिकेत स्थान का नाही? पद्मभूषण शशिकुमार चित्रे

राष्ट्रीय विज्ञान संस्थेद्वारा आयोजित नॅशनल स्टुडंट कॉन्फरन्सच्या पुस्तिकेचे विमोचन करताना पद्मभूषण शशीकुमार चित्रे व आशिष पातुरकर यांच्यासह विज्ञान संस्थेचे संचालक आर.जी. आत्राम, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक जयराम खोब्रागडे तसेच परिषदेचे समन्वयक मोहित माहुतकर, प्राची कठाणे व फ्रॅँक बॉर्टन.

Next
ठळक मुद्देइन्स्टिट्यूट ऑफ सॉयन्समध्ये राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेला आरंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर आधारीत व पेपर सादरीकरणापुरते मर्यादित असते. त्यामुळे नव्या संशोधकांनी अभ्यास पुस्तिकेत स्थान मिळेल, असे स्वत:चे काहीतरी निर्माण करावे, असे आवाहन ख्यातिप्राप्त गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्यावतीने ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन फंडामेंटल सायन्स’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. चित्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरी सायन्स विद्यापीठ (माफसू)चे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, आयोजन समितीचे समन्वयक विद्यार्थी प्रतिनिधी मोहित माहुरकर, प्राची कठाणे व फ्रॅँ क बॉर्टन व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. शशिकुमार चित्रे यांनी ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अ‍ॅन्ड सोसायटी’ या विषयावर आपले विचार मांडले. अंतराळाबद्दल लोकांमध्ये सुरुवातीपासून कुतूहल राहिले आहे. मात्र ते उघड्या डोळ्याने दिसते त्यापुरते मर्यादित होते. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावल्यानंतर अंतराळ संशोधनामध्ये क्रांतिकारक परिवर्तन निर्माण झाले. पुढे केपलरचे गणित सूत्र, न्यूटनचे गुरुत्वाकर्षण आणि आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादावरील सूत्रामुळे या क्षेत्रातील संशोधनाने प्रचंड वेग घेतला. १९५० नंतरचा काळ अंतराळ संशोधनाचा सुवर्णकाळ म्हणून मानला जातो. सॅटेलाईट, टीव्ही, आजचा मोबाईल आणि असंख्य प्रकारचे रासायनिक एलिमेंट हे खगोलशास्त्रातील संशोधनामुळेच शक्य झाल्याचे डॉ. चित्रे यांनी स्पष्ट केले. अंतराळ म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्राचा बेसिक अभ्यास करण्याची निसर्गाने निर्माण केलेली प्रयोगशाळाच होय, असे मत त्यांनी मांडले. चंद्र, सूर्याच्या सतत बदलणाऱ्या परिक्रमा, वातावरणातील बदल, आकाशगंगेतील ताऱ्यांचा पुंजका, हे सर्व संशोधनाचे विषय आहेत. या संशोधनातून नव्या ग्रहांची ओळख झाली. पूर्वी संशोधनासाठी हबल टेलिस्कोप ही एकच खिडकी होती. मात्र आज मानवाने चंद्र आणि मंगळावरही डिजिटल टेलिस्कोप लावला आहे.
एक्स-रे, गॅमा रेज या नव्या संशोधनाच्या खिडक्या उपलब्ध झाल्या आहेत. या खिडक्यातून आणखी संशोधन होईल तेव्हा आपणही आश्चर्य करू, अशी भावना त्यांनी मांडली. माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर व डॉ. सुरेंद्र गोळे यांनी ‘अप्लिकेशन ऑफ ऑपरेशन रिसर्च इन रियल लाईफ’ विषयावर संशोधनात्मक विचार मांडले. विज्ञान संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता देव यांच्या संयोजनातून या विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपला सूर्य नष्ट होईल काय?
खगोलशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन झाले असले तरी आपण केवळ तळाशीच पोहचलो आहोत. सूर्य हा ४.५ कोटी वर्षापूर्वी निर्माण झाल्याचे मानले जाते व तो त्याचे अर्धे आयुष्य जगल्याचे बोलले जाते. म्हणजे एवढ्याच वर्षांनी तो नष्ट होणार, हा कुतूहलाचा विषय नाही काय, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत जे संशोधन झाले ते केवळ ५ टक्के आहे. मात्र अंतराळात ९५ टक्के डार्क मटेरियल असू त्यापर्यंत अद्याप आपण पोहचलोच नाही. अनेक सूर्य, आकाशगंगा व आपल्यासारखी सजीवसृष्टी असलेली पृथ्वी अंतराळात असेल, ते संशोधन बाकी आहे. सोलर न्यूट्रिनो पझल, पॅराडॉक्स, ऑपरेशन ऑफ सोलर डायनॅमो, एक्स-रे बायनरी, प्रोटो स्टार्स, ब्लॅक होल अशा कितीतरी नव्या शाखा संशोधनासाठी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन डॉ. चित्रे यांनी केले.
परिषदेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग
डॉ. सुजाता देव यांनी सांगितले की, ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली परिषद आहे. यात देशभरातील नामांकित संस्थांच्या ४०० विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वत: संशोधित केलेले पेपर सादर केले. यामध्ये भौतिकशास्त्र व गणितासह सांख्यिकी शास्त्र, रसायनशास्त्र, मेडिसिनल केमिस्ट्री, क्वॉन्टम मेकॅनिक्स, इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, वनस्पती व प्राणी हे सजीवशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, सोलर एनर्जी आदी विषयाचे संशोधन असून त्या प्रत्येक विषयाच्या सादरीकरणासाठी संस्थेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक विषयाचे पोस्टर प्रेझेंटेशनही विद्यार्थ्यांनी केले असून परीक्षकांच्या अवलोकनानंतर यातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत.
सायन्स एक्सप्लोरेटरीचे विज्ञान मॉडेल्स
यावेळी राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरीच्यावतीने विज्ञान मॉडेल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मानवी शरीराची रचना, भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्राशी संबंधित मॉडेल्सचा समावेश आहे.

Web Title: Why is there no place in the study book of Indian research? Padmabhushan Shashikumar Chitre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.