मेट्राेच्या पार्किंगसाठी नीरीच्या जागेचा अट्टहास का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:08 AM2021-03-18T04:08:10+5:302021-03-18T04:08:10+5:30
नागपूर : अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न नीरीच्या हिरवाईवर आता मेट्राे रेल्वेची वक्रदृष्टी पडल्याचे दिसून येत आहे. अजनी मेट्राे स्टेशनच्या ...
नागपूर : अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न नीरीच्या हिरवाईवर आता मेट्राे रेल्वेची वक्रदृष्टी पडल्याचे दिसून येत आहे. अजनी मेट्राे स्टेशनच्या पार्किंगसाठी नीरीची जागा मागण्यात आली आहे. यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पार्किंगच्या जागेसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना मेट्राेला नीरीच्या हिरव्यागार जागेचाच अट्टहास का, असा सवाल पर्यावरण कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
वर्धा राेडवरील अजनीच्या मेट्राे स्टेशनसाठी मल्टीलेयर पार्किंग उभारण्यासाठी नीरीच्या परिसराची दाेन एकर जागा व येथील २४९ झाडे कापण्याची परवानगी महामेट्राे रेल्वे काॅर्पाेरेशनने महापालिकेकडे मागितली आहे. मनपाने त्याबाबत जाहिरात देऊन नागरिकांकडून आक्षेप मागविले आहेत. मात्र काेराेना काळात आक्षेप नाेंदवायला काेण जाईल, याचा विचारही महापालिकेने केल्याचे दिसत नाही. असाे, नीरीच्या जागेशिवाय इतर पर्याय असताना त्या जागेचा अट्टहास का केला जात आहे, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला आहे. अनसूया काळे-छाबरानी आणि श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी मेट्राेच्या मागणीबाबत मनपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पार्किंगच्या जागेसाठी पर्यायही सुचविले आहेत.
१) साईमंदिराकडून येताना मेट्राे स्टेशनच्या अलीकडे डावीकडे वळणाऱ्या रस्त्यावर मल्टीलेयर पार्किंग व्यवस्था केली जाऊ शकते. कारण मेट्राे स्टेशन झाल्यानंतर या रस्त्याचा उपयाेग राहणार नाही. २) मेट्राे स्टेशनच्या मागे असलेल्या झाेपडपट्टीजवळ माेठा भूखंड आहे, जेथे व्यवस्था हाेऊ शकते. येथील नागरिकांना पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत घरे बांधून दिल्यास त्यांनाही साेयीचे हाेईल, असा विश्वास अनसूया काळे यांनी व्यक्त केला. ३) तिसरा पर्याय चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील रिकामा भूखंड उपयाेगात आणला जाऊ शकताे, असे मत त्यांनी व्यक्त केले.