ट्रॅव्हल्स कशाला? आता एसटीतूनच करा आरामदायक प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 07:55 PM2023-03-25T19:55:53+5:302023-03-25T19:56:18+5:30

Nagpur News एसटी महामंडळाची लालपरी आता लवकरच नव्या आकर्षक लूकमध्ये नजरेस येणार आहे. महामंडळाने तशी तयारी केल्यामुळे एसटीच्या लक्झरी बसेस या महिन्यातच विविध मार्गावर धावताना बघायला मिळणार आहेत.

Why travels? Now make a comfortable journey from ST! | ट्रॅव्हल्स कशाला? आता एसटीतूनच करा आरामदायक प्रवास !

ट्रॅव्हल्स कशाला? आता एसटीतूनच करा आरामदायक प्रवास !

googlenewsNext

नागपूर : एसटी महामंडळाची लालपरी आता लवकरच नव्या आकर्षक लूकमध्ये नजरेस येणार आहे. महामंडळाने तशी तयारी केल्यामुळे एसटीच्या लक्झरी बसेस या महिन्यातच विविध मार्गावर धावताना बघायला मिळणार आहेत. बीएस-६ मॉडलच्या या नव्या बसेसमध्ये आरामदायक प्रवासाचा अनुभव प्रवासी घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, आधुनिक बनावटीच्या या बसेसमध्ये वेळोवेळी अनाउन्समेंट होणार असल्याने प्रवाशांना वेळोवेळी माहिती मिळणार आहे. चालक प्रवाशांसोबत माईक सिस्टमवरून संपर्कात राहणार आहे.

नागपूरला मिळणार ८० बसेस

राज्यात अशा प्रकारच्या ७०० बसेस तयार करण्याचे महामंडळाचे लक्ष्य आहे. त्यातील ८० बसेस नागपूरला मिळणार असल्याने नागपूरसह पुणे आणि औरंगाबादमध्येही अशा प्रकारच्या बसेस बनविण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते त्यातील १० बसेस नागपुरात लवकरच उपलब्ध होणार आहेत.

आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत

या बसेस इलेक्ट्रिक आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. प्रतितास ७० किलोमीटर या वेगाने त्या धावणार आहेत. बसला सॅटेलाइट सेंट्रल सर्व्हर जोडले जाणार असून व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार असल्यामुळे बसच्या लोकेशनची माहितीही प्रवाशांना मिळणार आहे. या सुविधेमुळे बसमधील प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत उपलब्ध होऊ शकणार आहे.

आरामदायक आणि आनंदी प्रवास

बसमध्ये विशिष्ट प्रकारच्या स्टीलचा वापर करण्यात आल्याने ही बस लालपरीच्या तुलनेत अधिक मजबूत राहणार आहे. बसमध्ये दोन बाय दोनच्या ४४ तसेच चालक वाहकासाठी वेगळ्या दोन अशा एकूण ४६ सिटची व्यवस्था करण्यात आली आहे. सीट मागे पुढे करता येणार आहे. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था राहणार आहे. खिडकीची व्यवस्थाही वेगळी करण्यात आली असल्यामुळे प्रवाशांना बाहेरचा निसर्गरम्य नजारा बघत आनंदी अन् आरामदायक प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.

नवीन बस बनविण्यासाठी १२५ कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. एक बस तयार करण्यासाठी १२.५ लाखांचा खर्च येणार आहे. लवकरच या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.

- अविनाश राजगुरू, कार्यशाळा व्यवस्थापक, हिंगणा

----

Web Title: Why travels? Now make a comfortable journey from ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.