सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 08:00 PM2020-07-20T20:00:31+5:302020-07-20T20:03:37+5:30

नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्यास प्रचंड ढिलाई होत आहे.

Why the vigilant administration? Bharatnagar becomes 'containment zone' after 24 hours | सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’

सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’

googlenewsNext
ठळक मुद्देएक मृत्यू अन् एक पॉझिटिव्हनंतरही थंड भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्यास प्रचंड ढिलाई होत आहे. भारतनगरात कोविडमुळे एकाचा मृत्यू व एक संक्रमित आढळला असतानाही ती वस्ती सील करण्यासाठी तब्बल २४ तासापेक्षा उशीर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे प्रशासन आता संक्रमणाच्या बाबतीत बेपर्वा असल्याचे स्पष्ट होत आहे, असा सूर नागरिक व्यक्त करत आहेत.


कोरोना प्रादुर्भावाच्या बातम्या झळकत असताना नागपुरात सापडलेल्या पहिल्या काही रुग्णांच्या वेळी प्रशासनाने प्रचंड तत्परता दाखवत तात्काळ जामबंदी केली होती. संक्रमणाचा वेग मुंबई, पुणे, दिल्लीच्या तुलनेत नागपूरमध्ये अतिशय मंद असतानाही ही तत्परता वाखाणण्याजोगी होती. मात्र, आता दर दिवसाला कोरोना स्फोट होऊ लागला असताना प्रशासकीय यंत्रणेत निर्माण झालेली ढिलाई कम्युनिटी स्प्रेडिंगला आमंत्रण देत असल्याचे दिसते. कळमना भागातील अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भारतनगरात रविवारी कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा रुग्ण बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. रविवारीच मृत्यू झालेल्या रुग्णाच्या दुसºया गल्लीतील वृद्धाही संक्रमित आढळून आली. या दोन्ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारासच्या आहेत. असे असतानाही ना मृत्यू झालेल्या रुग्णाची गल्ली ना संक्रमित वृद्धा असलेली गल्ली सील करण्यात आली. येथे प्रचंड वर्दळ होती, दूध डेअरी, भाजीविक्रेते, मुलांचा घोळका, नागरिक एकमेकांत सर्रास मिसळत असल्याचे दिसून येत होते. सोमवारी दुपारी १२ वाजता या परिसराचे निरीक्षण केले असता तेव्हाही बॅरिकेड्स, टिनाचे पत्रे वगैरे लावण्यात आले नव्हते. दुपारी २ वाजताच्या सुमारास मात्र सुरक्षा यंत्रणा, वस्ती सील करण्यासाठीचे साहित्य आणले गेले. वस्तीतून नऊ लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले. तोवर हे सगळे संशयित एकमेकांशी मिसळल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोण कोरोनाचा वाहक आहे आणि विषाणू कुठे कुठे स्प्रेड केला गेला, यामुळे या भागात प्रचंड दहशत आहे. या दोन्ही कोरोना रुग्णाच्या पाचव्या गल्लीपासून अतिशय दाट लोकवस्तीचे नेताजीनगर लागते. यावरून परिसरातील नागरिकांची स्थिती काय असेल, याचा अंदाज बांधता येतो.

मिरची बाजार बेपर्वा
कळमना बाजारातील मिरची मार्केटमध्येही एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे. या रुग्णाला उपचारासाठी नेले असताना त्याच्या घरातला व्यक्ती अजूनही त्याच बाजारात कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांसोबतच प्रशासनामध्येही संसर्ग रोखण्याबाबत ढिलाई आल्याचे दिसून येते.

कम्युनिटी स्प्रेडिंगविषयी संभ्रम का?
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसेल असा आता एकही परिसर राहिलेला नाही. त्यातच आता दररोज शेकडोंच्या संख्येने संक्रमित आढळत आहेत. प्रशासनाकडून कम्युनिटी स्प्रेडिंगबाबत अद्यापही स्पष्टीकरण दिले जात नसले तरी दररोज वाढत असलेला रुग्णांचा आकडा संशयाला वाचा फोडतो आहे. अशा वेळी कम्युनिटी स्प्रेडिंगबाबत संभ्रम निर्माण केले जाऊन, प्रशासनाकडूनच प्रचंड दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Why the vigilant administration? Bharatnagar becomes 'containment zone' after 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.