केळीबाग रस्ता रुंदीकरण :व्यापाऱ्यांना हवा नगदी मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:23 PM2018-05-12T22:23:08+5:302018-05-12T22:23:22+5:30
सर्वोच्च न्यायालयात केळीबाग रस्ता रुंदीकरणाची लढाई जिंकण्यात यश मिळाल्यानंतर स्वत: च्या मालकीच्या इमारती पाडून महापालिकेने रस्ता रुंदीकरणाला सुरूवात केली. परंतु रस्ता रुंदीकरण महापालिकेसाठी महागडे ठरत आहे. यात बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना ट्रान्सफरेबल डेव्हलपेंट राईट (टीडीआर) व फ्लोर स्पेस इंडेक्स ( एफएसआय ) स्वरुपात मोबदला घेण्यास व्यापाऱ्यानी नकार दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयात केळीबाग रस्ता रुंदीकरणाची लढाई जिंकण्यात यश मिळाल्यानंतर स्वत: च्या मालकीच्या इमारती पाडून महापालिकेने रस्ता रुंदीकरणाला सुरूवात केली. परंतु रस्ता रुंदीकरण महापालिकेसाठी महागडे ठरत आहे. यात बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना ट्रान्सफरेबल डेव्हलपेंट राईट (टीडीआर) व फ्लोर स्पेस इंडेक्स ( एफएसआय ) स्वरुपात मोबदला घेण्यास व्यापाऱ्यानी नकार दिला आहे. बाधितांना नगद मोबदला हवा आहे. या भागातील जागेचे भाव विचारात घेता यासाठी महापालिकेला १०० कोटीहून अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे.
मध्य नागपूर व दक्षिण नागपूरला जोडणारा केळीबाग मार्ग २४ मीटर रुंद क रण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. रस्ता रुंदीकरणामुळे महाल बाजारातील व्यापारी सर्वाधिक बाधित होणार आहेत. २९ मार्च २००८ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. यात सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील गांधीपुतळा ते बडकस चौक, कोतवाली पोलीस स्टेशन ते सीपी अॅन्ड बेरार कॉलेज दरम्यानच्या मार्गाचा समावेश आहे. यासाठी महापालिकेला मार्गाच्या दोन्ही बाजुची १४५५.८२ चौ. मीटर जागेची गरज भासणार आहे. १.५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग २४ मीटरचा केला जाणार आहे. सध्या हा मार्गा १० ते १५ मीटर रुंदीचा आहे. या मार्गात महापालिकेच्या सहा मालमत्ता, राज्य सरकारची जमीन व मातृसेवा संघ रुग्णालय बाधित होत आहे.
टीडीआर, एफएसआयला नकार
महापालिकेतर्फे १५७ दुकानदार व ५० निवासी मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बाधित व्यापारी व नागरिकांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. परंतु बहुसंख्य व्यापाऱ्यांना नगदी मोबदला हवा आहे. टीडीआर व एफएसआय घेण्याला त्यांचा नकार आहे.
दुप्पट रेडिरेकनर द्यावा लागेल
रस्यासाठी जागा अधिग्रहीत करताना बाधितांना भूमी अधिग्रहण कायद्यानुसार रेडिरेकनरच्या दराच्या तुलनेत दुप्पट मोबदला द्यावा लागणार आहे. यावर १०० कोटीहून अधिक खर्च करावा लागेल. अशी माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनी दिली. ही रक्कम कशी उभी करणार यावर बोलायला कुणीही तयार काही. नोटीसच्या उत्तरात गांधीबाग झोन कार्यालयाकडे ७० पत्रे आलेली आहेत. यात सर्वांनी नगदी रक्कम मिळावी. अशी मागणी केली आहे.
सिमेंटरोडच्या तिसऱ्या टप्प्पात काम
सिमेंट रोडच्या तिसऱ्या टप्प्यात केळीबाग मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. परंतु नगदी मोबदल्याची मागणी केल्याने रुंदीकरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु जागा घेणार असेल तर मोबदला मिळालाच पाहिजे. टीडीआरला काही किंमत नसल्याची व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.