पत्नी, मुलांनी दगड-विटांनी ठेचले : घरगुती वादातून ईसमाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:51 PM2019-05-09T23:51:50+5:302019-05-09T23:57:04+5:30
दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या एका व्यक्तीची त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलांनी दगड-विटांनी ठेचून हत्या केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौक परिसरात गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या एका व्यक्तीची त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलांनी दगड-विटांनी ठेचून हत्या केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौक परिसरात गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. रवी अडूळकर (वय ५१) असे मृताचे नाव आहे तर त्याची हत्या करण्याच्या आरोपात पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले, त्यांची नावे उषा रवी अडूळकर, मुलगा अक्षय (वय २२) आणि अभिषेक (वय २५) अशी आहेत.
रवी अडूळकरचे महालमधील झेंडा चौक परिसरात निवासस्थान आहे. त्याला अक्षय आणि अभिषेक ही तरुण मुले आहेत. त्याची वडिलोपार्जित चांगली मालमत्ता असून, तीन चार दुकानेही बाजारपेठेत आहेत. त्यातून रवीला किरायाच्या रुपात मोठी रक्कम यायची. बाहेरख्याली वृत्तीच्या रवीने अनेक वर्षांपासून पत्नीचा अक्षरश: छळ चालवला होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आणि मुलांना मारहाणही करायचा. त्यामुळे पत्नीने त्याच्याविरुद्ध चार वर्षांपूर्वी छळाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी कलम ४९८ अन्वये रवीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशात रवीने दुसºया एका महिलेसोबत संसार थाटला होता. तो तिच्यासोबत हिंगणा परिसरात राहायचा. त्याने वाºयावर सोडल्याने पत्नी आणि मुलांचे हाल होते. ते कसेबसे आपला उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, पत्नी उषाने दाखल केलेल्या प्रकरणाची आज कोर्टात तारीख होती. तेथे हजर झाल्यानंतर रवीच्या मनात काय आले माहीत नाही. तो गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास रागाने तणतणतच पत्नी उषाकडे आला. त्याने तिला नको त्या भाषेत शिवीगाळ सुरू केली. यावेळी दोन्ही मुलांनी त्याची समजूत घालून त्याला निघून जाण्यास सांगितले. मात्र, रवी ऐकायला तयार नव्हता. तो उषाला मारहाण करू लागला. त्यामुळे पत्नी उषा, अक्षय आणि अभिषेकने त्याचा प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्याला हातात येईल तो दगड, विटांचे तुकडे उचलून ठेचणे सुरू केले. डोक्यावर अनेक वार झाल्याने रवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी मायलेकांची कशीबशी समजूत काढली. त्यानंतर कोतवाली पोलिसांना कळविले.
कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रवीला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बायको-पोरांची केली होती कोंडी
गजबजलेल्या भागात ही अनपेक्षित घटना घडल्याने शेजारीच नव्हे तर परिसरातील रहिवाशांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रवीचे वर्तन चांगले नव्हते. त्याने पत्नी आणि तरुण मुलांना एकाकी सोडून त्यांची आर्थिक व मानसिक कोंडी केली होती. पती किंवा वडिलांचे कर्तव्य तो पार पाडत नव्हता. मात्र, पत्नी आणि मुलांवर आपला अधिकार दाखवून त्यांचा तो छळ करायचा. घराच्या मुख्य दाराने जाण्यायेण्यासही त्याने मनाई केली होती. विरोध केला असता त्यांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी मुख्य दाराने येत जात असल्याचे पाहून आज त्याने घराचा जिना तोडणे सुरू केले. त्याचे हे वर्तन सहन करण्यापलिकडचे होते. त्यामुळे पत्नी व मुलांच्या संतापाचा भडका उडाला व तो निर्घृणपणे मारला गेला.
मुलांचेही भवितव्य काळोखात
कौटुंबिक कलह कोणत्या थराला जाऊ शकतो, त्याचे हे प्रकरण थरारक उदाहरण ठरावे. संशयी आणि बाहेरख्याली वृत्तीच्या रवी अडूळकरने दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध जोडून पत्नी आणि मुलाला आधी वाऱ्यावर सोडले. आता तो स्वत: मारला गेला तर त्याच्या हत्येच्या आरोपात त्याच्या पत्नीसोबत मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसानंतर त्यांची कारागृहात रवानगी होईल. त्यामुळे आधी पत्नीचे आणि आता दोन्ही तरुण मुलांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.