पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका
By admin | Published: December 25, 2015 03:44 AM2015-12-25T03:44:53+5:302015-12-25T03:44:53+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीच्या हत्याप्रकरणातील आरोपी पतीची निर्दोष सुटका केली आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीच्या हत्याप्रकरणातील आरोपी पतीची निर्दोष सुटका केली आहे. अशोक बंसीलाल इंगळे (४३) असे आरोपीचे नाव असून तो सेवादलनगरातील रहिवासी आहे. १६ मार्च २०१३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. मृताचे नाव संगीता होते. संगीताच्या मृत्यूपूर्व बयानानुसार, आरोपी नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे न दिल्यास संगीताला मारहाण करीत होता. याशिवाय आरोपी हा संगीता व मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ८ मार्च २०१२ रोजी आरोपीने संगीताच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. यामुळे संगीता गंभीररीत्या जळाली. १६ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाने संगीताचे हे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद ठरविले. सक्करदरा पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता.(प्रतिनिधी)