सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवता येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:07 AM2021-01-23T04:07:58+5:302021-01-23T04:07:58+5:30
नागपूर : पतीने केलेल्या मोघम व सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च ...
नागपूर : पतीने केलेल्या मोघम व सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले व पतीने घटस्फोट मिळण्यासाठी दाखल केलेले अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला.
नागपूर येथील प्रवीण व प्रणिता (बदललेली नावे) यांचे २८ सप्टेंबर, २०१४ रोजी लग्न झाले. प्रवीणचे वडील हृदयरुग्ण असून, आई आजारपणामुळे खाटेला खिळली आहे. प्रणिता त्यांची काळजी घेत नाही. त्यांना घालूनपाडून बोलते. त्यांच्यासोबत सतत भांडत राहते. कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडत नाही. वेळेवर स्वयंपाक करीत नाही. सतत अवमानजनक शब्दांचा उपयोग करते. तिने सासू-सासऱ्याला मारण्यासाठी आईकडे विषाची मागणी केली होती. तिने कौटुंबिक हिंसाचाराची खोटी तक्रारही दाखल केली, असे आरोप प्रवीणने केले होते, परंतु हे आरोप क्रूरतेचा ठोस पुरावा ठरत नसल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. प्रवीणने घटस्फोटाकरिता सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका खारीज करण्यात आल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्याला दिलासा देण्यास नकार दिला.