पतीपाठोपाठ पत्नीचा मृत्यू
By admin | Published: June 21, 2017 02:17 AM2017-06-21T02:17:06+5:302017-06-21T02:17:06+5:30
पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नी मुलासोबत मोटरसायकलने जायला निघाली असता खाली कोसळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेवाडा : पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नी मुलासोबत मोटरसायकलने जायला निघाली असता खाली कोसळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पतीपाठोपाठ तिनेही जगाचा अखेरचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे भिवापूर तालुक्यातील टाका या गावात मंगळवारी शोककळा पसरली होती.
माधव गोमाजी खोब्रागडे (४५) व पंचशीला माधव खोब्रागडे (४२) रा. टाका, ता. भिवापूर अशी या दुर्दैवी पती -पत्नीची नावे आहेत. खोब्रागडे कुटुंबीय कामाच्या शोधात नागपूरला गेले होते. माधवला कारखान्यात काम मिळाल्याने ते मुलगा सम्यक व मुलगी संबोधी यांच्यासोबत नागपूरलाच किरायाने घर घेऊन राहू लागले. आई, वडील व भाऊ टाका येथे राहात असल्याने माधव घराच्या दुरुस्तीसाठी रविवारी (दि. १८) दुपारी टाका येथे आले होते.
सोमवारी (दि. १९) दुपारी माधवची प्रकृती अचानक बिघडली आणि सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनाची बातमी कळताच पंचशीला यांना धक्काच बसला. त्या सोमवारी सायंकाळी मुलगा सम्यक व मुलगी संबोधीसोबत मोटरसायकलने टाका येथे यायला निघाल्या.
नागपूरहून टाका येथे येत असताना उमरेड-भिसी मार्गावरील गरडापार परिसरात मोटरसायकल उसळली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.